राष्ट्रीय सेवा योजनेत "स.प.' उत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय यांची उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही महाविद्यालयांतील अनुक्रमे डॉ. विलास उगले आणि डॉ. प्रताप फलफले यांना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी हा विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये पिंपरीतील मघनमल उधाराम महाविद्यालय आणि तेथील कार्यक्रम अधिकारी विशाल अमोलिक, जुन्नर येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि तेथील अशोक दुशिंग, नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालय आणि तेथील कार्यक्रम अधिकारी एन. बी. गुरुळे उत्कृष्ट ठरले आहेत.

जिल्हास्तरीय पुरस्कारार्थींमध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील सोनाली भोसले, इंदापूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील दत्तात्रेय रास्ते, नगर येथील सुशीलाताई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील पुष्पक जाधव, नाशिक येथील आरएनसी आर्ट, जेडीबी बिटको महाविद्यालयातील माधुरी महाले यांची निवड झाली आहे.

आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील सुधीर बोराटे आणि भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. सविता इटकर यांची प्रशंसा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण समारंभपूर्वक केले जाणार आहे. विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात 16 नोव्हेंबर रोजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

राज्य पुरस्कारासाठी शिफारस
पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा दिग्विजय निंबाळकर याची उत्कृष्ट स्वयंसेवक या विद्यापीठस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने त्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठीदेखील शिफारस केली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेले संगमनेर महाविद्यालय आणि त्यांचे कार्यक्रमाधिकारी डॉ. फलफले यांचीही राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

Web Title: pune news sir parshurambhau college topper in nss