कुशल मनुष्यबळासाठी पुढाकार

सलील उरुणकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे - कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे स्टार्टअप्सने संगणक अभियंत्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्स सुरू केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ब्लॉकचेन अशा विविध तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण अभियंत्यांना देण्यात येत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘आयटी प्रोफेशनल्स’कडे या तंत्रज्ञानांचे नवकौशल्य नसल्यामुळे अनेक बड्या कंपन्यांसह स्टार्टअप्सला कुशल मनुष्यबळ निर्मिती स्वतःच करावी लागत असल्याचे दिसत आहे. 

‘ऑटोमेशन’ या शब्दाची धास्ती जशी अन्य क्षेत्रांना आहे, तशी ती माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रालाही आहे. त्यामुळेच नवे तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात न करणाऱ्या संगणक अभियंत्यांच्या डोक्‍यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार सतत आहे. कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंगचे काम करत असताना इंडस्ट्रीतील बदलत्या परिस्थितीचा अंदाज नसल्यामुळे आज शेकडो संगणक अभियंत्यांना बेरोजगार व्हावे लागत आहे. पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या बड्या कंपन्यांमध्ये याच कारणास्तव कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला कुशल मनुष्यबळाची कमतरता कंपन्यांना भासत आहे. 

‘विझिटेक सोल्युशन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदसागर शिराळकर म्हणाले, ‘‘ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवा देणाऱ्या कंपन्यांना या तंत्रज्ञानाची माहिती असलेले प्रोग्रॅमर, डेव्हलपर असे कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे मोफत ऑनलाइन कोर्सेसद्वारे आम्ही संगणक अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यावर भर देत आहोत. वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना तर अशा कुशल मनुष्यबळाची गरज भविष्यात लागणार आहे. या दृष्टीने पुण्यात ब्लॉकचेन संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे.

जपानमधील ‘चेनटोप’ या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून त्याची स्थापना करण्यात आली आहे.’’

इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक ऑटोमेशन, डिस्ट्रिब्युटेड लेजर्स, मशिन लर्निंग, ऑग्मेन्टेड रिॲलिटी अशा न्यू-एज टेक्‍नोलॉजीमुळे केवळ आपले दैनंदिन आयुष्य बदलणार आहे, असे नाही तर नोकरी किंवा रोजगार मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये सर्वांना आत्मसात करावी लागणार आहेत. झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून, व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन आणि इंडस्ट्रीला आवश्‍यक असलेली त्यांची अंमलबजावणी करता येणारे प्रोफेशनल्स सध्या उपलब्ध होत नाहीत. त्याचे कारण असे, की अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पुस्तकी पद्धतीने प्रोग्रॅमिंग शिकविले जाते. ‘लॉजिकल थिंकिंग’ला फारसा वाव महाविद्यालयांमध्ये दिला जात नाही. हे बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही काही महाविद्यालयांमध्ये या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचे छोटे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत.’’
- योगेश पंडित, ‘हेक्‍झानिका’चे संस्थापक

Web Title: pune news Skilled manpower initiatives