गोरा रंग तो एक दिन...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे - त्वचेचा नैसर्गिक रंग अधिक गोरा करण्यासाठी अप्रमाणित इंजेक्‍शन घेतली जात असून, यामुळे येणारे गोरेपण कायमस्वरूपी टिकत तर नाहीच, पण त्वचाविकाराच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पुणे - त्वचेचा नैसर्गिक रंग अधिक गोरा करण्यासाठी अप्रमाणित इंजेक्‍शन घेतली जात असून, यामुळे येणारे गोरेपण कायमस्वरूपी टिकत तर नाहीच, पण त्वचाविकाराच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

भारतीयांमधील गोरे होण्याची क्रेझ लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बेसुमार ‘फेअरनेस’ क्रीम बाजारात आणल्या. डॉक्‍टरांच्या दृष्टिकोनातून याचा फायदा आणि तोटाही काहीच नसल्याने धोका नव्हता; मात्र याला वाढणारा प्रतिसाद लक्षात घेऊन गोरे होण्यासाठीचा ‘काळाबाजार’ सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हायड्रोक्रीनोनसारखे घातक घटक असलेले मलम अगदी गरजेवेळी आणि कमी काळासाठी वापरणे गरजेचे असताना याचा फेअरनेस क्रीम म्हणून सर्रास वापर सुरू झाला. त्यामुळे पुरळ, त्वचा जळणे असे परिणाम दिसून येऊ लागले. याबाबत बोलताना डॉ. नितीन ढेपे म्हणाले, ‘‘अशा घातक मलमांच्या अतिरेकी वापरामुळे चेहरा खराब झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज १५ ते २० रुग्ण ही तक्रार घेऊन येत आहेत. त्यामुळे आमच्या संघटनेवर या घातक मलमांविरोधात मोहीम उघडण्याची वेळ आली आहे.’’

इंजेक्‍शनचा वापर धोकादायक
सलाइन किंवा थेट इंजेक्‍शद्वारे औषध घेऊन चेहरा गोरा करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत; मात्र यामध्येही धोका असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. वास्तविक हे औषध चेहरा गोरा करण्यासाठी म्हणून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतर औषधोपचारामध्ये याचा वापर प्रमाणित आहे; मात्र एफडीआयने प्रमाणित केले नसले तरी ‘ऑफलेबल’ म्हणून अनेक डॉक्‍टर आणि कंपन्यांकडून या औषधाचा वापर चेहरा गोरा करण्यासाठी म्हणून केला जात आहे; मात्र हे इंजेक्‍शन घेतल्यानंतर चेहऱ्यावर पुरळ येणे, जखमा होणे, त्वचा जळल्यासारखी काळी पडणे आणि इंजेक्‍शन दिल्यानंतर श्‍वास कोंडल्यासारखे होण्याच्या तक्रारी येत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

चीनमधून ‘घुसखोरी’
गुटाथायोन या औषधाला होणारी वाढती मागणी लक्षात घेऊन चीनमधून याची मोठ्या संख्येने आयात होत आहे; मात्र मसाज तेल म्हणून ‘गुटाथायोन’ची आयात करण्यात येत असल्याने कोणतेही गुणवत्ता नियंत्रण राखले जात नाही. तेल म्हणून आलेल्या अप्रमाणित ‘गुटाथोयोन’ची औषध म्हणून अगदी स्वस्त दरात विक्री केली जात आहे. गोरे होण्यासाठी दहा इंजेक्‍शन घ्यावी लागतात. एका इंजेक्‍शसाठी चीनमधून येणाऱ्या तेलाची किंमत ५ ते ७ हजार आहे, तर  इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘गुटाथोयोन’ची किंमत २० ते ३० हजार रुपये आहे. किमतीमध्ये इतकी मोठी तफावत असल्याने तरुणांकडून अप्रमाणित औषधांचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियातून भुरळ
इंजेक्‍शनच्या माध्यमातून गोरे होण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना भुरळ घातली जात आहे. हे औषध वापरा आणि गोरे व्हा...हे चित्राद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे औषध ‘हर्बल’ असून, कोणताही साइडइफेक्‍ट होणार नाही, असे सांगितले जात असले तरी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच औषध घेण्याचा सल्लाही दिला जात आहे.

२० ते ३० वर्षे वयोगटातील वाढती मागणी
त्वचा गोरी करण्यासाठी यापूर्वी हळदीसारखे घरगुती उपचार केले जात होते. आधुनिक काळात गोरे होण्यासाठी वैद्यकीय उपचारांची मोठी बाजारपेठ खुली होत आहे. त्यात वेगवेगळ्या क्रीमपासून ते औषधांपर्यंतचा समावेश आहे. अर्थात यातील बहुतांश क्रीममध्ये स्टिरॉइड्‌स असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी ती धोकादायक आहेत. त्यामुळे चेहऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीममध्ये स्टिरॉइडस्‌ आहे का, याची वापरण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अशी काळजी घ्या
चौरस आहाराने त्वचेचे आरोग्य चांगले राहते
रात्री पुरेशी झोप अवश्‍य घ्या
उन्हात फिरू नका

दुष्परिणाम
त्वचा सैल होणे
त्वचा काळी होणे
पुरळ येणे
चेहऱ्यावर केस वाढणे

आधुनिक काळात सोशल मीडियामुळे चेहरा उजळ असणे मुलींना आवश्‍यक वाटते. तसेच लग्नासाठी सावळ्या मुलींचा त्वचा गोरी करण्याकडे कल वाढत आहे. त्यासाठी वेगवेगळी इंजेक्‍शन आणि क्रीमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या सर्व उपचारांच्या दुष्परिणामांचाही मुलींनी विचार करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ

Web Title: pune news skin sickness danger colour