करिअरसाठी स्काय इज द लिमिट

करिअरसाठी स्काय इज द लिमिट

अभियांत्रिकीचे विश्‍व

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी शाखेकडे असतो. यातदेखील विद्यार्थी मुख्यत्वे संगणक, आयटी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, सिव्हिल या शाखांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत असतात. अभियांत्रिकीत एकूण ७० प्रकारचे चार वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. ते पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. 

बायोमेडिकल इंजिनिअरिंग : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक (सिटी स्कॅन) यंत्रणांचा अभ्यासक्रम यामध्ये येतो. त्यामुळे विविध इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांमध्ये भरपूर संधी मिळते. अभ्यासक्रम मुंबईत उपलब्ध.

पेट्रोलियम इंजिनिअरिंग : पेट्रोलियमच्या उत्खननापासून शुद्धीकरणापर्यंत संपूर्ण अभियांत्रिकी प्रक्रिया यामध्ये सामावली जाते. विविध पेट्रोलियम कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना भारतात व भारताबाहेर उत्तम संधी मिळतात. अभ्यासक्रम पुण्यात उपलब्ध.

पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग : विविध पेट्रोलियम उत्पादनांसंबंधी हे अभियांत्रिकी क्षेत्र आहे. विविध पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना भारतात व भारताबाहेर उत्तम संधी मिळतात. अभ्यासक्रम पुण्यात उपलब्ध.

प्रिटिंग इंजिनिअरिंग : दैनिके, साप्ताहिके, मासिके, नियतकालिके यांचा वाढता वापर असल्याने या क्षेत्राला महत्त्व आहे. छपाई यंत्रणा अभियांत्रिकी यात शिकविली जाते. पदवीनंतर नोकरी व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी. अभ्यासक्रम पुण्यात उपलब्ध.

टेक्‍स्टाइल इंजिनिअरिंग : टेक्‍स्टाइल उद्योगांमध्ये लागणाऱ्या विविध यंत्रणांचा अभ्यास यात शिकविला जातो. त्याच क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी. अभ्यासक्रम इचलकरंजीमध्ये उपलब्ध.

पॉवर इंजिनिअरिंग : पुढील २५ वर्षांत भारतात सर्वांत विकसित होणारे क्षेत्र म्हणजे वीज उत्पादन क्षेत्र. त्या विषयीचे संपूर्ण ज्ञान देणारा अभ्यासक्रम. त्यामुळे वीज उत्पादन क्षेत्रामध्ये भरपूर संधी. अभ्यासक्रम नागपूरमध्ये उपलब्ध.

इन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग : गेल्या काही वर्षांत सर्वच उद्योगांत पर्यावरण विषयाचे महत्त्व वाढते आहे. यातील अभियांत्रिकी शिकविणारा हा अभ्यासक्रम. देश व परदेशातील सर्व उद्योगांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी. अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध. 

ॲिग्रकल्चर इंजिनिअरिंग : भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कृषीविषयक सर्व यंत्रणांचा अभ्यास या शाखेत उपलब्ध. कृषी औजारेनिर्मिती क्षेत्रात संधी. अभ्यासक्रम औरंगाबादमध्ये उपलब्ध.

प्लॅस्टिग अँड पॉलिमर इंजिनिअरिंग : माणसाचे जीवन आता प्लॅस्टिक वस्तूंनी व्यापलेले आहे. त्याची निर्मिती, यंत्रणा, मोल्डिंग आदी विविध विषयांचा अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम. रोजगार, स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी. अभ्यासक्रम पुण्यात उपलब्ध.

फूड टेक्‍नॉलॉजी : अन्नप्रक्रिया व साठवण क्षेत्रात लागणारी सर्व यंत्रणांचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. अभ्यासक्रम मुंबईत उपलब्ध.

मायनिंग इंजिनिअरिंग : भारतातील मूलभूत उद्योगांपैकी एक म्हणजे खाणउद्योग. त्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान शिकविणारा हा अभ्यासक्रम. खाण उद्योगात विपुल संधी.

शुल्करचना
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यातील विविध महाविद्यालयांचे शुल्क साठ हजारांपासून ते सव्वा लाख रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे आकारले जाते.
सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळ : www.sssamiti.org

महाविद्यालय निवडताना...
१. महाविद्यालयाचे संकेतस्थळ जरूर पाहावे. त्या महाविद्यालयात झालेल्या कॅंपस प्लेसमेंटची माहिती मिळवावी. महाविद्यालयाचे शुल्क शिक्षण शुल्क समितीच्या संकेतस्थळावरून  (www.sssamiti.org) करून घ्यावे. त्यानंतरच महाविद्यालयाची निवड करावी.
२. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीचे सर्व महाविद्यालयांचे शाखानिहाय ‘कटऑफ’ गुण उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून आपल्याला मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणती महाविद्यालये आणि शाखा मिळू शकतात, याचा अभ्यास करा.
३. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ टक्के जागा या जेईई-मेनच्या गुणांवर भरल्या जाणार आहेत.

शाखा निवडताना
१. मित्र किंवा शेजारी यांच्या ऐकीव माहितीवर शाखेची निवड करू नये.
२.  आपल्या आवडीच्या विविध शाखांची माहिती त्या क्षेत्रातील एखाद्या शिक्षक वा अभियंत्याकडून जाणून घ्यावी. 
३. या शाखेमध्ये पुढे मिळू शकणाऱ्या नोकरीच्या, उच्च शिक्षणाच्या, परदेशी जाण्याच्या संधींची माहिती करून घ्यावी.

या संस्थांमध्ये संधी 
एनआयटी/ आयआयआयटी : या संस्थांतील प्रवेश फक्त ‘जेईई मेन्स’मधील श्रेणीवर आधारित असतील. बारावीच्या मार्कांना महत्त्व दिले जाणार नाही. पण किमान पात्रतेसाठी बारावी बोर्डामध्ये पाच विषयांमध्ये ७५ टक्के गुण मिळविणे आवश्‍यक आहे. 

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) : प्रसिद्ध विज्ञान महाविद्यालय असलेल्या ‘आयआयएसईआर’च्या सात ठिकाणच्या शैक्षणिक संकुलातील प्रवेश तीन निकषांवर आधारित आहेत. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) शिष्यवृत्ती मिळविली असल्यास अथवा जेईई-ॲडव्हान्समध्ये पहिल्या दहा हजारांमध्ये समावेश असल्यास किंवा बारावी बोर्डाच्या कटऑफ गुणांसह ‘आयसर’ प्रवेश परीक्षा पास केली असल्यास येथे प्रवेश मिळू शकतो. या परीक्षेची जाहिरात लवकरच आयसरच्या संकेतस्थळावर येईल.

शारीरिक शिक्षण आणि क्रीडाक्षेत्र

क्रीडा, व्यायाम व शारीरिक तंदुरुस्ती यांस मानवी जीवनात महत्त्व आहे. आपण अनेक खेळ खेळतो, अगदी पैजा लावून सामन्याचा आनंद लुटतो. मग हे क्षेत्र इतके आवडीचे आहे, तर आपण त्यात करिअर करू शकतो, कारण गेल्या काही दशकांमध्ये खेळाच्या व्यावसासिक लीग स्पर्धा; तसेच जागतिकीकरणाने खेळ हा मोठा उद्योग झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खेळाडू असण्याशिवाय खेळाशी निगडित अनेक क्षेत्र करिअरसाठी खुली झाली आहेत. खेळ, क्रीडा शारीरिक शिक्षण या क्षेत्रात आपण उत्तम करिअर करू शकतो. 
- प्रा. शिरीष मोरे

बारावीच्या निकालानंतर अभ्यासक्रम निवडण्यासाठी ‘स्काय इज द लिमिट’ अशी स्थिती असते. नक्की कुठं ॲडमिशन घ्यायची, त्या अभ्यासक्रमाचे भवितव्य काय याबद्दल तुमच्याही घरात चर्चा रंगल्या असतील. विविध अभ्यासक्रम, तज्ज्ञांचा सल्ला व हटके क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांच्या मतांद्वारे तुम्हाला मदत करण्याचा हा एक प्रयत्न...तेव्हा, ‘ऑल द बेस्ट’...

आपल्याला शारीरिक शिक्षणात अभिरुची असेल अथवा क्रीडाक्षेत्रातच काम करण्याची इच्छा असेल तर बीपीएड, एमपीएड, एमफील, पीएचडी इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या पदवी अभ्यासक्रमांचे पारंपरिक स्वरूप बदलून सध्याच्या गरजेप्रमाणे आमूलाग्र बदल झाले आहेत. पुण्यामध्ये चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय हे अभ्यासक्रम राबवित आहे. बीपीएडनंतर शारीरिक शिक्षण शिक्षक व पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर महाविद्यालयीन स्तरावर शारीरिक शिक्षण संचालक पदावर आपली नेमणूक होऊ शकते. अनेक शाळा, क्रीडा मंडळे विविध क्रीडा प्रशिक्षण उपक्रम राबवित असतात. त्या ठिकाणीही क्रीडा प्रशिक्षकांची गरज भासते. या व्यतिरिक्तही आपण या क्षेत्रात करिअर करू शकता. 

क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, पंच, संघ फिटनेस एक्‍सपर्ट क्रीडा वैद्यक तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, क्रीडा आहारतज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, जीवयांत्रिक शास्त्रज्ञ अशा प्रकारचे करिअर आपण करू शकता.

जाहिरात क्षेत्र, मार्केटिंग, क्रीडासाहित्य, क्रीडा पोशाखनिर्मिती, रेडिओ, वाहिन्यांवरील सूत्रसंचालन, क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन आदी अनेक क्षेत्रांत आपण काम करू शकतो. 

सध्याच्या युगात हेल्थ क्‍लबला वाढते महत्त्व आहे. आपण पर्सनल ट्रेनर, टीम फिटनेस एक्‍स्पर्ट, वेलनेस कन्सल्टंट इत्यादी अनेक प्रकारची कामे करू शकता. 

मसाज, प्ले सेंटर, रीक्रिएशन सेंटर, दिव्यांगांसाठी उपचारपद्धती, अशा अनेक मार्गांनी आपण या क्षेत्रात काम करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com