छोट्या सदनिकेत एकच श्‍वान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे - तुमची सदनिका पाचशे चौरस फुटांची असेल, तर तुम्हाला आता एकच श्‍वान पाळता येईल. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सदनिकेत फार तर दोन श्‍वान पाळण्यास महापालिकेची परवानगी मिळेल. मात्र एवढ्या जागांमध्ये दोनपेक्षा अधिक श्‍वान पाळण्यावर बंधने येणार आहेत. पाळीव प्राण्यांची हेळसांड आणि आजूबाजूच्या रहिवाशांचा त्रास रोखण्यासाठी महापालिकेने प्राणी पाळण्याबाबत नियम आखण्यात येत आहेत. त्यात, प्राधान्याने या बाबींचा समावेश केला आहे. शिवाय, मांजर पाळण्यासंदर्भातही नवे नियम ठरविण्यात येणार आहेत.

पुणे - तुमची सदनिका पाचशे चौरस फुटांची असेल, तर तुम्हाला आता एकच श्‍वान पाळता येईल. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सदनिकेत फार तर दोन श्‍वान पाळण्यास महापालिकेची परवानगी मिळेल. मात्र एवढ्या जागांमध्ये दोनपेक्षा अधिक श्‍वान पाळण्यावर बंधने येणार आहेत. पाळीव प्राण्यांची हेळसांड आणि आजूबाजूच्या रहिवाशांचा त्रास रोखण्यासाठी महापालिकेने प्राणी पाळण्याबाबत नियम आखण्यात येत आहेत. त्यात, प्राधान्याने या बाबींचा समावेश केला आहे. शिवाय, मांजर पाळण्यासंदर्भातही नवे नियम ठरविण्यात येणार आहेत.

प्राणिप्रेमींच्या सूचनांनुसार नवे नियम आखण्यात येणार आहेत. दरम्यान प्राणी पाळण्याबाबत अद्याप धोरण केलेले नाही मात्र नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याबाबत नियम असतील, असे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

शहरात प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढत असून, विशेषत: सोसायट्या आणि बंगल्यांमधील रहिवाशांचा त्याकडे अधिक कल आहे. त्यात, आवड म्हणूनच प्राणी पाळले जात असल्याचे दिसून आले आहे. परंतु प्राण्यांच्या वागण्यांमुळे इतरांना त्रास होऊन वादाच्या घटना घडत असल्याचे आढळून आले आहे.

अशा वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांसंदर्भात नियमावली करण्याची मागणी आहे. ज्यामध्ये प्राधान्याने प्राणी, सोसायटीतील रहिवासी, प्राणी पाळणारी व्यक्ती आणि प्राणिप्रेमींचा विचार व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर प्राणी पाळण्याबाबत नियम आखून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महिला व बालकल्याण समितीकडे मांडला होता. त्यावर चर्चा करून नियमावली करण्याची सूचना समितीने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे.

वर्दळीच्या ठिकाणी विक्रीस बंदी 
श्‍वान आणि अन्य पाळीव प्राण्यांची विक्री करण्यावर काही प्रमाणात बंधने घालण्याचे धोरण महापालिकेने घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि वर्दळीच्या भागांपासून शंभर मीटर परिसरात प्राण्यांची विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात सामान्य नागरिक, प्राणिप्रेमींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. वर्दळीच्या ठिकाणी विशेषतः श्‍वानांची विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तसे नियम करण्याचे नियोजन असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

संभाव्य नियमावली 
  पाळीव प्राण्यांसाठी राहण्याची पुरेशी व्यवस्था
  आहार, आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा 
  घर आणि सोसायटी परिसरात या प्राण्यांना हिंडण्यासाठी जागा 
  वाहनांच्या वर्दळ असलेल्या भागात या प्राण्यांसाठी सुरक्षितता
  पाळीव प्राण्यांमुळे अनुचित घटना घडल्यास जबाबदारी निश्‍चित होणार 
  पाळीव प्राण्यांना रोज सकाळी-सायंकाळी फिरायला नेण्याची व्यवस्था

पाळीव प्राण्यांबाबतच्या तक्रारी 
  पाळीव प्राण्यांचा आवाज
  सोसायटीचे आवार, जिन्यात अस्वच्छता
  चावा घेणे 
  पाळीव प्राण्यांच्या आजारपणामुळे होणारा त्रास

खबरदारी न घेतल्याने पाळीव प्राण्यांचा इतरांना त्रास होऊन वादाच्या घटना घडत आहेत. त्याचा परिणाम प्राण्यांवर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्राणी, ती पाळणारी व्यक्ती, नागरिक आणि प्राणिप्रेमींच्या दृष्टीने नियमावली करण्याची सूचना केली आहे. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.
- राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, महापालिका

पाळीव प्राण्यांमुळे त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. या घटनांमध्ये काही जण न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या पुढील काळात पाळीव प्राण्यांबाबत नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित घटकांशी चर्चा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सदनिकांच्या आकाराच्या प्रमाणात श्‍वान पाळण्यास परवानगी देण्यात येईल. शिवाय, घरात श्‍वान पाळण्याकरिता महापालिकेची परवानगी घ्यावीच लागेल. 
- वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

प्राणी पाळण्याबाबत नियमावली हवी. विशेषत: कुत्रा पाळण्याकरिता महापालिकेचा परवाना घेतला पाहिजे. मात्र तो घेतला जात नाही. शिवाय, प्राण्यांची काळजी घेतली जावी, यासाठी नियमांचा बडगा हवाच. परंतु अंमलबजावणीही झाली पाहिजे. 
- विनय गोरे, प्राणिप्रेमी 

Web Title: pune news small home one dog