‘स्मार्ट’ला महापालिकेचाच ब्रेक

‘स्मार्ट’ला महापालिकेचाच ब्रेक

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पात औंध, बाणेर, बालेवाडीमधील हद्दवाढ करण्याचा ठराव पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळात मंजूर होऊनही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी न मिळाल्यामुळे रखडला आहे. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. हा ठराव सर्वसाधारण सभेपुढे सादर करावा, अशी तीन विनंतीपत्रे स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेला सादर केली आहेत.

औंध, बाणेर, बालेवाडीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे; परंतु त्याच परिसरातील काही रस्ते आणि उर्वरित भाग महापालिकेतच असल्यामुळे विकास योजनांमध्ये असमतोल झाला आहे. त्यामुळे औंध-बाणेर प्रभाग समितीमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये औंध, बाणेर आणि बालेवाडीतील उर्वरित परिसराचाही स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करावा, असा ठराव करून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांडण्यात आला. तेथेही हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.

विशेष अधिकार वापरावा
महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील भाग स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात समाविष्ट करायचा असल्यामुळे त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कंपनीत मंजूर झालेला हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर आणणे अपेक्षित होते; मात्र डिसेंबरमध्ये तो प्रस्ताव सभेपुढे आला नाही. जानेवारी महिन्याच्या कार्यपत्रिकेवर त्याचा समावेश होईल, अशी स्मार्ट सिटी कंपनीची अपेक्षा होती; परंतु जानेवारीमध्येही तो प्रस्ताव कार्यपत्रिकेत आलेला नाही. त्यामुळे आता आयुक्तांनी विशेष अधिकार वापरला तरच १६ आणि १७ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा ठराव मंजुरीसाठी येण्याची शक्‍यता आहे.

शीतयुद्धाचा प्रकल्पांना फटका!
महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. सायकल आराखडा, रस्त्यावरचे फलक आदींमधून ते दिसून आले आहे. तसाच प्रकार आता हद्दवाढीच्या ठरावाबाबत सुरू असल्याचे दिसत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात औंध, बाणेर, बालेवाडीची सुमारे ६ चौरस किलोमीटर हद्द आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर ती सुमारे १५ चौरस किलोमीटर होणार आहे.

विकासकामे रखडली
औंध, बाणेर आणि बालेवाडीचा जो भाग स्मार्ट सिटीमध्ये आहे, त्याच्या लगतचे रस्ते मात्र महापालिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकसनाला अडथळे येत आहेत. विकास आराखड्यातील रस्त्यांचीही कामे रखडली आहेत. स्मार्ट सिटी कंपनीला ८ पैकी ४ ॲमिनेटी स्पेस हस्तांतरित झाल्या आहेत. जागा नसल्यामुळे कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजित प्रकल्प रखडले आहेत. रस्ते आणि पदपथांचीही कामे रखडली आहेत. तसेच विकासकामांचेही नियोजन कंपनीला सध्या करता येत नाही. परिणामी औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये असंतुलित विकासाची भीती निर्माण झाली आहे.

स्मार्ट सिटीची हद्दवाढ झाली, तरी खर्चात वाढ होणार नाही, आहे त्याच खर्चात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा विकास होणार आहे. औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात सर्वत्र सारखा विकास व्हावा, हा हद्दवाढीचा मुख्य उद्देश आहे. तसेच संपूर्ण भागात आता पायाभूत सुविधांची कामे स्मार्ट सिटी कंपनीला करण्यास भाग पाडू. त्यातूनच संतुलित विकास होईल.
- विजय शेवाळे, अध्यक्ष, औंध- बाणेर प्रभाग समिती

विकास आराखड्यात बाणेर, बालेवाडीमध्ये रस्ते दाखविण्यात आले आहेत; परंतु काही भाग महापालिकेत व काही भाग स्मार्ट सिटीमध्ये असल्यामुळे त्यांची कामे रखडली आहेत. तसेच कचरा, पिण्याचे पाणी, सांडपाणी आदी सुविधांचेही नियोजन करणे शक्‍य नाही. संपूर्ण परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पात गेला, तर जागा उपलब्ध होतील आणि सुविधाही वाढतील, अशी अपेक्षा आहे.
- अमोल बालवडकर, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com