स्मार्ट सिटीतील कामांचे निघाले वाभाडे ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे -  "रस्त्यांचे पुरेसे रुंदीकरण झालेले नाही', "रस्त्यावरील पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही', "कामांचा वेग कमी आहे', "सुधारणेला अजूनही मोठा वाव आहे', अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे यांनी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांचे बुधवारी वाभाडे काढले. निमित्त होते ते, स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामांच्या उद्‌घाटनाचे. 

पुणे -  "रस्त्यांचे पुरेसे रुंदीकरण झालेले नाही', "रस्त्यावरील पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही', "कामांचा वेग कमी आहे', "सुधारणेला अजूनही मोठा वाव आहे', अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे यांनी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांचे बुधवारी वाभाडे काढले. निमित्त होते ते, स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामांच्या उद्‌घाटनाचे. 

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात औंधमध्ये दीड किलोमीटरच्या स्मार्ट स्ट्रीट आणि बाणेरमधील प्लेस मेकिंगचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्मार्ट सिटीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचे उद्‌घाटन झाल्यावर भाषणात काळे यांनी स्मार्ट सिटीमधील कामाच्या पद्धतीवर सडकून टीका केली अन्‌ बापटांनीही त्याची दखल घेतली. बापट म्हणाले, ""स्मार्ट सिटीबद्दल नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. त्यांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनीही वेळेवर कामे केली पाहिजे. नाही तर, त्यांच्या खिशातून नागरिकांचे पैसे वसूल करावे लागतील.'' शहराचा विकास आराखडा वेगाने मंजूर झाला. मेट्रोचे काम धडाक्‍यात सुरू आहे. मात्र, स्मार्ट सिटीची कामे रखडली आहेत. या कामांचा वेग धीम्या गतीने सुरू आहे, असे नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.'' 

आमदार काळे म्हणाले, ""स्मार्ट सिटीच्या नियोजनात लोकप्रतिनिधींचा विचार होत नाही, असे दिसते. रस्ते मोठे व्हायला हवेत. औंधमधील वाहतूक कोंडी दूर होणे गरजेचे आहे. रस्त्यावर सांडपाण्याच्या वाहिन्या आहेत; परंतु त्यांचा आकार अजूनही लहानच आहे. नदीत सर्रास सांडपाणी सोडले जात आहे अन्‌ म्हणे ही आहे स्मार्ट सिटी. पुणे विद्यापीठ ते बाह्यवळणरस्ता दरम्यान स्मार्ट सिटीचे काम करा, असे सुरवातीला म्हटले होते; परंतु ते झाले नाही. आता मात्र, त्याकडे लक्ष दिले जात आहे.'' स्मार्ट सिटीची कामे नागरिकांवर लादू नका. औंधकर ती स्वीकारणार नाहीत. नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्या, असेही त्यांनी बजावले. 

महापौर टिळक, आमदार कुलकर्णी आदींची भाषणे झाली. राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. औंध बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, सुनीता वाडेकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे, माधुरी सहस्रबुद्धे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

विरोधी पक्षांनी विकासात सहभागी व्हा 
कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबूराव चांदेरे, माजी महापौर दत्ता गायकवाड उपस्थित होते. त्याची दखल पालकमंत्री बापट यांनी घेतली. स्मार्ट सिटी म्हणजे शहराचा प्रकल्प आहे. त्यात सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आम्ही बरोबर घेतो, असे बापट यांनी चांदेरे, गायकवाड यांना आवर्जुन सांगितले. निवडून आल्यावर राजकारण सोडून शहराच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले. 

आणखी 20 ठिकाणी प्लेसमेकिंग 
औंध, बाणेर आणि बालेवाडीतील आठ आणि शहरातील 12 ठिकाणी प्लेस मेकिंग करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले जाऊ शकेल, असे प्रकल्प नागरिकांना दिसतील. तसेच स्मार्ट स्ट्रीटच्या धर्तीवर आणखी 20 किलोमीटरचे पदपथ स्मार्ट करण्याचे काम सुरू झाले आहे, असे स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी सांगितले; तर, शहरात 200 ठिकाणी मोफत वाय-फाय योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचे उद्‌घाटन होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: pune news smart city pmc