सोशल मीडियाचा योग्य वापर करायला हवा - नागराज मंजुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पुणे - सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. पण, या माध्यमामुळे सायबर क्राइमचे गुन्हेही तितकेच वाढले आहेत. एक माणूस कुठेही बसून वाट्टेल ते करू शकतो. हल्ली सोशल मीडियाद्वारे जे पसरवले जाते, ते गंभीर स्वरूप घेत आहे. या घटना काल्पनिक नसून, त्या आपल्या सभोवताली घडतात. म्हणून याकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे आणि या माध्यमाचा योग्य वापर करायला हवा,'' असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

"क्विक हिल फाउंडेशन'ने पुणे सायबर पोलिसांच्या सहकार्याने सायबर सुरक्षा जागृतीवर आयोजिलेल्या "साय-फाय करंडक 2017' या एकांकिका स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी मंजुळे बोलत होते. अभिनेते विक्रम गोखले, पोलिस उपायुक्त (सायबर क्राइम) सुधीर हिरेमठ आणि क्विक हिल टेक्‍नॉलॉजीस्‌ लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर या वेळी उपस्थित होते. ही एकांकिका स्पर्धा रविवारपर्यंत (ता. 24) चालणार असून, राज्यभरातील 20 संघ यात सायबर क्राइम याविषयी जनजागृती करणाऱ्या एकांकिका सादर करणार आहेत.

मंजुळे म्हणाले, 'सायबर गुन्ह्यांनी भयावह स्वरूप घेतले आहे. मध्यंतरी माझेही फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. हे व्हॅर्च्युअल जग खरे आहे की खोटे, हा प्रश्‍नच पडतो. फेसबुक अकाउंट हॅक होण्यासह मोबाइलचा पासवर्डही हॅक केला जातो. हे मोठे संकट असून, या गुन्ह्यांमुळे सोशल मीडियाचे जग दूषित झाले आहे. कोण कुठून काय करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पण, आपल्याला त्याचे गांभीर्य नाही. आपण त्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे आणि असे गुन्हे थांबावेत, यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी एकांकिका स्पर्धा हे चांगले व्यासपीठ आहे. आज नाटकातील विचार बोथट होत असताना अशा ज्वलंत विषयांवर एकांकिका निर्माण झाल्या पाहिजेत.''

गोखले म्हणाले, 'सध्या मी रंगभूमीपासून दूर आहे. मात्र, रंगभूमीशी निगडित असताना मी ज्या गावांमध्ये गेलो, तेथील पोलिसांशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले. मी पोलिस, शेतकरी आणि जवान यांचा आदर करतो. सायबर क्राइम सध्याच्या घडीला महत्त्वाचा विषय आहे. तरुण लेखक, कलाकार आणि दिग्दर्शक अशा विषयांना प्राधान्यक्रम देत आहेत. त्यांच्यावर माझा विश्‍वास आहे. रंगभूमीशी निगडित ते काहीतरी करत असल्याचा आनंदही आहे. दुसरा चुका करतो हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. एकांकिकेडे कमी तरुण वळतात, ही खेदाची बाब आहे.''

हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. अजय शिर्के यांनी सूत्रसंचालन केले.

'रंगभूमी ही गांभीर्याने पाहण्यासारखी गोष्ट आहे. रंगभूमीवर आपण प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन शिकत असतो. रंगभूमी ही रेशनिंगसाठी करायची गोष्ट नाही, तर त्यातून नव्या पिढीला संधी देणे आणि त्यातून नवीन कलाकार घडविण्याचे माध्यम आहे. म्हणूनच दिग्दर्शकांनी नवोदितांना संधी देणे ही त्यांची जबाबदारी आहे,''
- विक्रम गोखले, अभिनेते

भरत नाट्य मंदिर - "साय-फाय करंडक 2017'च्या उद्‌घाटनप्रसंगी चर्चेत रंगलेले नागराज मंजुळे आणि विक्रम गोखले. या वेळी सुधीर हिरेमठ उपस्थित होते.

Web Title: pune news Social media should be used properly