सोशल मीडियावर वेब सीरिजची धम्माल!

सुवर्णा चव्हाण 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पुणे - एखादी शॉर्टफिल्म तयार करावी, असे नितीनच्या मनात होते; पण त्याच्या मित्रांनी शॉर्टफिल्म करण्यापेक्षा वेब सीरिज कर, असे सुचवले अन्‌ नितीन कामाला लागला. मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने त्याने वेब सीरिज शूट केली अन्‌ युट्यूबवर अपलोडही केली... दोन दिवसांत तब्बल चाळीस हजार जणांनी ती पाहिलीही... हा आहे तरुणांमधला नवीन ट्रेंड.

पुणे - एखादी शॉर्टफिल्म तयार करावी, असे नितीनच्या मनात होते; पण त्याच्या मित्रांनी शॉर्टफिल्म करण्यापेक्षा वेब सीरिज कर, असे सुचवले अन्‌ नितीन कामाला लागला. मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने त्याने वेब सीरिज शूट केली अन्‌ युट्यूबवर अपलोडही केली... दोन दिवसांत तब्बल चाळीस हजार जणांनी ती पाहिलीही... हा आहे तरुणांमधला नवीन ट्रेंड.

महाविद्यालयातील विद्यार्थी असो वा नोकरदार. तरुणांनी एकांकिका, शॉर्टफिल्म अन्‌ नाटकांच्या जोडीला आता वेब सीरिज तयार करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून तरुणच तरुणांमधील गंभीर विषयांवर प्रकाशझोत टाकत आहेत. युट्यूब आणि फेसबुकवर या वेब सीरिज पाहायला मिळत आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या धर्तीवर आता सोशल मीडियावर ‘वेब सीरिज’चा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड वाढल्याचे वेब सीरिज तयार करणारे तरुण सांगतात. दिग्दर्शकापासून ते सीरिजमध्ये काम करण्यापर्यंतचे सर्व काम तरुण करत आहेत.

ज्वलंत विषयांवर प्रकाश...
वेब सीरिजमध्ये सामाजिक विषयही हाताळले जात आहेत. थ्रिलर, रोमॅंटिक आणि विनोदी कथानकावर आधारित वेब सीरिजही युट्यूबवर पाहायला मिळतील. तरुणांमधील ताणतणाव, करिअर, प्रेम, आई-वडिलांशी असलेले नातेसंबंध आदी विषयांवरही वेब सीरिज तयार केल्या जात आहेत.

काय आहे वेब सीरिज?
दूरचित्रवाणीवरील मालिकांप्रमाणे या वेब सीरिज शूट केल्या जातात. ५ ते ३५ मिनिटांच्या या सीरिजमध्ये विविध विषय हाताळले जातात. एका कथानकाभोवती फिरणाऱ्या या सीरिजमधून कलाकारांना नवे व्यासपीठ मिळत आहे. एका वेब सीरिजचे कमीत-कमी तीन ते दहा भाग युट्यूब किंवा फेसबुकवर दाखवले जातात.

कशा तयार होतात?
प्रथम वेब सीरिजची संहिता तयार केली जाते. त्यानुसार कलाकारांची निवड केली जाते. कॅमेरामन, कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि शूटिंगसाठीच्या लोकेशनची जुळवाजुळव झाल्यानंतर या वेब सीरिज शूट केल्या जातात. त्यानंतर ती युट्यूबवर शेअर केली जाते. हौशी तरुणांना सीरिज तयार करण्यासाठी २० ते ५० हजार रुपयांचा खर्च येत आहे.

कशा पाहता येतील?
वेब सीरिजचा एखादा भाग युट्यूबवर दाखविण्यापूर्वी त्याची प्रसिद्धी केली जाते. वेब सीरिजच्या ऑफिशियल फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आणि ट्‌विटरवरील अकाउंटवर त्याची प्रसिद्धी होते आणि वेब सीरिजची लिंक यावर शेअर केली जाते. त्या लिंकवर क्‍लिक केल्यास आपल्याला ती सीरिज पाहायला मिळेल. वेब सीरिजच्या ऑफिशियल संकेतस्थळावरही ती पाहता येईल.

विविध विषय घेऊन या वेब सीरिज तयार केल्या जात आहेत. आम्हीदेखील दहा भागांची सीरिज तयार केली असून, त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पटकथेपासून ते सीरिज शूट करण्यापर्यंतचे सर्व काम तरुणच करतात. ती शूट केल्यानंतर युट्यूबवर अपलोड करून तिची लिंक शेअर केली जाते. या सीरिजला आता स्पॉन्सरशिपही मिळत आहेत. त्यामुळे वेब सीरिज तयार करणे सोपे झाले आहे.
- नितीन वाघ, दिग्दर्शक, वेब सीरिज

माझ्यासारख्या कित्येक कलाकारांना यातून व्यासपीठ मिळाले आहे. मालिकांप्रमाणेच या सीरिज असतात. फरक इतकाच, की त्या ऑनलाइन पाहायला मिळतात. दर आठवड्याला दाखविल्या जाणाऱ्या सीरिजला चांगली विवरशिप मिळत आहे. तरुणांना व्यक्त होण्यासाठी हे प्रभावी माध्यम मिळाले असून, त्याचा वापर ते योग्यरीत्या करत आहेत.
- अक्षता गायगवारे, कलाकार

Web Title: pune news social media Web series