सौरऊर्जेने सोसायटीला ‘तेजोवलय’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे - विजेच्या टंचाईवर सौरऊर्जेच्या माध्यमातून मात करता येऊ शकते. वारज्याच्या तेजोवलय सोसायटीतील सदस्यांनी आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे. अपारंपरिक ऊर्जेला चालना देण्यासाठी सोसायटीतील ११ इमारतींसाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्चून ६६ केव्हीचे सोलर पॅनेल बसविण्यात आले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रविराज सहकारी गृहरचना संस्थेत (तेजोवलय गृह प्रकल्प) बसविण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्‌घाटन सोमवार (ता. ८) सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोसायटीने यापूर्वीच गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. 

सोसायटीतील लिफ्ट, पिण्याच्या पाण्याचा पंप, सार्वजनिक दिव्यांसाठी या सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे वीजबिलात बचत होणार असून, सोसायटीच्या देखभाल खर्चातही बचत होणार आहे. 

संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती येनपुरे, सचिव निंबा बोरसे, खजिनदार राधिका सराफ, समिती सदस्य दीपक ढमढेरे आणि अन्य सदस्य व सभासदांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. 

याबाबत येनपुरे म्हणाले, ‘‘पर्यावरण संतुलनासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक असते. अपारंपरिक ऊर्जेला चालना देण्यासाठी आणि विजेची बचत होण्यासाठी आम्ही हा प्रकल्प बसविला. कारण सोसायटीला यापूर्वी दरमहा ऐंशी ते पंचाऐंशी हजार रुपये वीजबिल येत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी सोसायटीच्या एक कोटीच्या मुदत ठेवीवर बॅंकेकडून ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून हा प्रकल्प उभारला आहे. ‘मेडा’मार्फत संस्थेला तीस टक्के अनुदानही मिळणार आहे.’’

Web Title: pune news solar power in society