कृत्रिम घरट्यांत चिमण्यांचा चिवचिवाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - काँक्रिटच्या जंगलात चिमण्या कृत्रिम घरट्यांचा आधार घेऊ लागल्या आहेत. या घरट्यांत चिमण्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ब्राह्मण मैना, साळुंकी, दयाळ, खार, ग्रेट टीट यांसारख्या अन्य प्रजातींच्या पक्ष्यांपेक्षाही चिमण्या विशेषत्वाने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे वन विभाग आणि ईला फाउंडेशनने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

पुणे - काँक्रिटच्या जंगलात चिमण्या कृत्रिम घरट्यांचा आधार घेऊ लागल्या आहेत. या घरट्यांत चिमण्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ब्राह्मण मैना, साळुंकी, दयाळ, खार, ग्रेट टीट यांसारख्या अन्य प्रजातींच्या पक्ष्यांपेक्षाही चिमण्या विशेषत्वाने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे वन विभाग आणि ईला फाउंडेशनने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

आज (ता. २०) जागतिक चिमणी दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर ईला फाउंडेशनचे प्रमुख संशोधक पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम करतेवेळी इमारतीत छोट्या-छोट्या जागा चिमण्यांच्या घरट्यासाठी सोडाव्यात, असे याद्वारे सुचविणार असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शहरातील वाडे जवळपास नष्ट झाले आहेत. इमारतींमध्ये चिमण्यांना प्रजननासाठी जागा नसते, त्यामुळे शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यावर पर्याय म्हणून कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग ते चंद्रपूर येथपर्यंत कृत्रिम घरट्यांचे वाटप केले. त्यावरून चिमण्यांच्या प्रजनन व संवर्धनाचा अभ्यास केला. त्यातून चिमण्या कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे निदर्शनास आले.’’ 

‘‘वर्षभर केलेल्या अभ्यासातून चिमण्यांनी कृत्रिम घरट्यांचा स्वीकार  करणे, अंडी घालणे, घरट्यात अंडी फुटून पिलू जन्माला येणे, जन्मलेले पिलू घरट्यातून उडून जाणे आदी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यासाठी राज्यातील ६३४ नागरिकांना ११०० घरटी वाटली. तत्पूर्वी पर्यावरणप्रेमी नागरिक, सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आदी १८३१ जणांना चिमण्यांच्या प्रजनन व संवर्धनाविषयी वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिले. वर्षभर चिमण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यामध्ये कमीतकमी ६८ दिवस या घरट्यात चिमण्या निवास करतात, हे निरीक्षणातून जाणवले,’’ असेही डॉ. पांडे यांनी सांगितले.

८४.८ टक्के कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करणाऱ्या चिमण्यांचे प्रमाण
२.६६ टक्के कृत्रिम घरट्यांत चिमण्यांचे अंडी घालण्याचे प्रमाण 
८०.७ टक्के कृत्रिम घरट्यांत अंडी फुटून पिले जन्माला येण्याचे प्रमाण 
८८.२ टक्के कृत्रिम घरट्यांत जन्मून उडालेल्या पिलांचे प्रमाण

Web Title: pune news sparrow artificial nest