उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला...

रामदास वाडेकर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

सध्या खेडोपाडी काकडा आरती सोहळयात गाव दुमदुमून निघाला आहे.

टाकवे बुद्रुक : उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरूडापारी दाटला! वाळवंटापासूनि महाद्वारा पर्यत सुरवरांची मांदी उभे जोडोनि हात! असे अभंग, भुपाळ्या, भजन, वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळे, मुका बहिरा, गवळणी, रूपक, महाआरती, पसायदान गाऊन गावोगावी काकडा आरतीचा गजर सुरू आहे. भल्या पहाटेच गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल नामाचा महिमा गायला जातोय.  

यासाठी गावातील सार्वजनिक मंडळे, काकडा आरती सोहळा समितीने पुढाकार घेतला आहे, विठ्ठल नामाचा जप आणि संताच्या ओव्या मावळ वासीयांसाठी अप्रूप ठेवा आहे, या ठेव्याचे जतन बाराही महिने वेगवेगळ्या उपक्रमातून जतन केले जात आहे. सध्या खेडोपाडी काकडा आरती सोहळयात गाव दुमदुमून निघाला आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटे पासून हा सोहळा सुरू होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला काल्याचे किर्तन व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होते.  

तत्पूर्वी महिनाभर या सोहळ्यातील अमृतमय शब्दांचे स्वरात भाविक तल्लीन होऊन बेभानपणे 'नाचू किर्तनाचे रंगी'म्हणून नाचत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे ४ च्या सुमारास मंदिरातील ध्वनीनिपेक्षकावरून 'राम कृष्ण हरी. . जय जय राम कृष्ण हरी 'मंत्राचे स्वर बाहेर पडतात, आणि गावातील अबाल वृद्धांची पावले मंदिराकडे पडतात, राम कृष्ण हरी मंत्रा पासून सुरू होणारे भजन अभंग, भुपाळया, ओव्या गात पुढे जात, याच दरम्यान गावातील प्रत्येक कुटूंबातील सदस्य 'श्री. विठ्ठल रखूमाई मंदिरात 'मोठ्या भक्तीने विठ्ठलाची पूजा करीत आहे. प्रत्येकाला पूजेचा बहुमान मिळाल्याने गावाचा या उपक्रमात आपसूक सहभाग वाढतो.  

दिवाळी दिव्याचा आणि रांगोळी सण, हा सण सुरू होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर विठ्ठल रखूमाई मंदिरे दिव्याची आरास, सुबक रांगोळ्याच्या ठिबक्यांनी सजून जावू लागले आहे. प्रसाद, चहापाणीनी या कार्यात अधिक रंग भरीत आहे.  

Web Title: pune news spiritual initiative in takve budruk