अभ्यासाबरोबरच छंदही जोपासावेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

दहावीत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचे मत

पुणे - परीक्षेत यश मिळण्यासाठी ‘अभ्यास एके अभ्यास’ उपयोगी पडत नाही. त्याला छंदाची जोड दिली, तर त्याचा फायदाच होतो. मानसिक ताणापासून मुक्ती होते आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे अभ्यासाबरोबर छंदही जोपासावेत, अशी भावना दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. 

डीईएस सेकंडरी स्कूलची मृण्मयी चितळे, अहिल्यादेवी शाळेची साक्षी जोशी आणि सेवासदन शाळेची रश्‍मी दाते यांचा ‘सकाळ’च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. साक्षी म्हणाली, ‘‘शंभर टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा नव्हतीच. दहावीत असताना गायन शिकत होते. अन्य छंदही जोपासले. दहावी फार काही मोठे दिव्य नाही, हे घरातून सांगितले गेले. त्यामुळे ताण अजिबात आला नाही. छंदामुळे एकाग्रता वाढण्यास मदतच झाली. माझे प्रेरणास्थान अब्दुल कलाम आहेत.’’

रश्‍मी म्हणाली, ‘‘दहावीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाचे नियोजन केले होते. अभ्यास आणि छंदाला कितीवेळ द्यायचे हे ठरलेले होते. त्यामुळे परीक्षेपूर्वी अभ्यासाची धांदल उडाली नाही. या काळात मी चित्रकला आणि नृत्यकला जोपासली. त्यामुळे रिलॅक्‍स वाटत राहिले. विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास करायचा हे ठरविण्यापेक्षा अभ्यासक्रमांतील संकल्पना चांगल्या समजून घेतल्या पाहिजेत. भविष्यात मला फॅशन डिझायनिंग करायचे आहे.’’

खेळही तितकाच महत्त्वाचा
मृण्मयी चितळे म्हणाली, ‘‘अभ्यास महत्त्वाचा तेवढेच छंदही महत्त्वाचे आहेत. जगण्याचा आनंद कलेतून मिळतो. मी दहावीत असताना नृत्यकला जोपासली आहे. खेळांमध्येही भाग घेतला. आयुष्यात खेळाला खूप महत्त्व आहे. यामुळे खिलाडू वृत्ती बनते. अपयश पचविण्याची ताकद वाढते. ताणतणाव सहन करण्याची, ते दूर करण्याची क्षमता वाढते. त्याचा खूप फायदा होतो.’’

Web Title: pune news ssc success girls talking