एसटी वाहतूक ठप्प; ऐन दिवाळीत प्रवाशांचे मोठे हाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत मंगळवारी पुण्यासह राज्यातील सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली. या संपात पुणे विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पुणे विभागाच्या 13 डेपोमधील एकही गाडी रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे दिवाळीत गावाला निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुपारनंतर एसटी स्थानकांवरून खासगी गाड्या सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

पुणे - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत मंगळवारी पुण्यासह राज्यातील सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली. या संपात पुणे विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पुणे विभागाच्या 13 डेपोमधील एकही गाडी रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे दिवाळीत गावाला निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुपारनंतर एसटी स्थानकांवरून खासगी गाड्या सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

संपाची हाक यापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी दिली होती. मात्र काल (सोमवारी) मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत तोडगा निघेल, असे वाटत होते. मात्र तो न निघाल्यामुळे रात्री बारापासून संपाला सुरवात झाली. त्यामुळे रात्री उशिरा सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटू शकल्या नाहीत. रात्रीच्या गाड्यांचे तिकीट बुकिंग केलेल्या अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला. रात्री उशिरा बाहेर गावावरून पुण्यात आलेल्या गाड्याही कर्मचाऱ्यांनी तेथेच सोडून दिल्या. मात्र संपाची तीव्रता आज सकाळी दिसू लागली. पहाटे पाचपासूनच स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे स्टेशन येथे प्रवाशांची गावी जाण्यासाठी गर्दी झाली. 

या संपात महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, विदर्भ एसटी संघटना या संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले. परिणामी या तिन्ही ठिकाणांहून राज्यात आणि परराज्यात दररोज जाणाऱ्या जवळपास 280 ते 300 गाड्या डेपोंमध्येच उभ्या राहिल्या. शिवनेरी व अश्‍वमेध या खासगी ठेकेदारांच्या गाड्याही संपात सहभागी झाल्या. त्यामुळे दिवाळीच्या सुटीमध्ये गावी जाण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले. दिवाळीमध्ये पुण्याहून मुंबई, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, लातूर, धाराशीव, कोल्हापूर, सोलापूर याबरोबरच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे हे प्रवासी एसटी गाड्यांचे बुकिंग करतात. मात्र, संपामुळे तिकीट बुक केलेले असतानाही प्रवाशांना खासगी गाडीने प्रवास करावा लागला. दरम्यान, ऐन दिवाळीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कशी टाळता येईल, यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक, आरटीओ अधिकारी आणि खासगी वाहतूकदारांची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरात प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन खासगी वाहतूकदारांना करण्यात आले. त्यानुसार स्कूल बस, व्होल्वो, कार अशा वाहनांच्या माध्यमातून एसटी स्थानकावरील प्रवाशांना प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यात येत होती. 

पुणे विभागातील सद्यःस्थिती 
एसटीच्या गाड्यांची संख्या - 954 
डेपो - 13 
दररोजच्या बसफेऱ्यांची संख्या - 5 हजारांहून अधिक 
दररोजचे प्रवासी - सुमारे 3 लाख 
दररोजचे उत्पन्न - सुमारे 1 कोटी 

पुणे विभागाचे एक कोटीचे नुकसान 
पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्थानक, पिंपरी- चिंचवड या डेपोमधील एकही गाडी मार्गावर आली नाही. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात एसटीचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. 

दिवाळीसाठीच्या जादा गाड्यांचे नियोजन कोलमडले 
पुणे विभागाने दिवाळीसाठी 2 हजार 658 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी- चिंचवड बस स्थानक, महात्मा फुले कृषी महाविद्यालय या ठिकाणांहून या गाड्यांचे संचालन करण्यात येत होते. मात्र, संपामुळे या जादा गाड्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले. 

स्वारगेट स्थानकावर तणाव 
प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी वाहतूकदारांमार्फत स्वारगेट येथील एसटी स्थानकातून काही गाड्या सोडण्यात आल्या. त्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध करत एका गाडीच्या चाकातील हवा सोडली. त्यामुळे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर एसटी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात खासगी गाड्यांचे संचालन केले. 

एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना 
- प्रत्येक डेपोत एसटीचा एक पालक अधिकारी तैनात 
- अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे वारंवार आवाहन 
- एसटी गाड्यांचे संचालन करण्यासाठी खासगी चालक मिळविण्याचे प्रयत्न 

परतावा देण्याची व्यवस्था 
गावी जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केले होते; तर काही प्रवाशांनी तिकीट खरेदी केली होती. मात्र संपामुळे त्यांना गावी जाता आले नाही. त्यांना तिकिटाच्या रकमेचा परतावा (रिफंड) देण्यासाठी स्वारगेट येथे स्वतंत्र काउंटर ठेवण्यात आले होते; तर ऑनलाइन तिकीट घेतलेल्या नागरिकांना ऑनलाइन रिफंड देणार असल्याचे आगार व्यवस्थापक सुनील भोकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news st bus msrtc