एसटी, रेल्वेच्या प्रवाशी संख्येत घट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - शहरात गेल्या वर्षभरात तब्बल पावणेतीन लाख नव्या खासगी वाहनांची भर पडली असतानाच, दुसरीकडे मात्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि रेल्वे या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या प्रवाशी संख्येत घट झाली आहे. ही चिंताजनक बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालात आढळून आली आहे. तसेच हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, मुळा-मुठा नदी दूषित झाल्याचे दिसून आले असून, सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरातून वाहणारा नदीचा भाग सर्वाधिक दूषित झाल्याचे आढळले आहे. 

पुणेकरांची जीवनशैली बदलत असल्यानेच सार्वजनिक वाहतूक सेवेचे प्रवासी घटले असल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविले आहे, तर नदीपात्रात सांडपाणी आणि कचरा टाकला जात असल्याने ती प्रदूषित झाली आहे, असे म्हटले आहे. महापालिकेने सादर केलेल्या शहराच्या पर्यावरण अहवालात (2016-17) ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. 

रेल्वेची प्रवाशी संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजारांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी 2015-16 मध्ये रोज सरासरी दोन लाख 18 हजार प्रवासी संख्या होती. त्यात आता एक हजाराने घट झाली आहे. त्यानुसार यंदा 79 लाख 5 हजार, तर गेल्या वर्षी 79 लाख 9 हजार प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला होता. तसेच "एसटी'तून यंदा रोज तीन लाख 4 हजार, तर गेल्या वर्षी 3 लाख 23 हजार जणांनी प्रवास केला होता. त्यानुसार या वर्षभरात 1 कोटी 10 लाख जणांनी प्रवास केल्याची नोंद आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या पुणेकरांची संख्या वर्षाकाठी वाढत असून, गेल्या वर्षभरात पुण्यातून सुमारे 65 लाख 12 हजार जणांनी विमान प्रवास केला आहे. त्यानुसार रोज 17 हजार 441 जणांनी विमान प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. 

महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या सुमारे 42 किलोमीटरच्या परिसरात विविध ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. विशेषत: विठ्ठलवाडीमधील नदीचा भाग दूषित झाला आहे. त्यापाठोपाठ एरंडवणा, ओंकारेश्‍वर, एस. एम. जोशी पूल, म्हात्रे पूल येथील नदीचे पात्र प्रदूषित झाल्याचे म्हटले आहे. 

पुण्यात 33 लाख वाहने 
पुणे शहरात मार्चअखेर सुमारे 33 लाख 37 हजार 370 वाहने असल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक दुचाक्‍यांचे प्रमाण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन लाख 70 हजार नव्या वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे रोज सरासरी सुमारे 915 वाहने शहरातील रस्त्यावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे साधारणत: साडेसहाशे दुचाक्‍यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: pune news st bus railway