सामान्य प्रवाशांची चोहोबाजूंनी लूट 

 सामान्य प्रवाशांची चोहोबाजूंनी लूट 

पुणे - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची चोहोबाजूने कशाप्रकारे लूट केली जात आहे, याचे धक्कादायक चित्र बुधवारी प्रत्यक्षपणे स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्थानकांवर पाहावयास मिळाले. पोलिस, एसटी महामंडळाचे काही अधिकारी आणि एजंट यांच्यात अभद्र युती झाली आणि त्यांनी मधल्यामध्ये "हात' मारण्यास सुरवात केली, त्यामुळे तिकिटांचे दर दुपटीहून अधिक झाले. 

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खासगी बसचालकांना आवाहन करून गाड्या पुरविण्याची विनंती केली. खासगी बसचालकांनी विनंती मान्य करीत काल दिवसभरात शंभरहून अधिक गाड्या पुरविल्या. त्यासाठी एसटी भाडेदराच्या दहा टक्के जादा दर आकारण्यास त्यांना परवानगी देण्यात आली. तसेच, स्थानकातही गाड्या उभारण्यास परवानगी दिली. काल दिवसभर या पद्धतीने खासगी बसचालकांकडून मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, काल रात्रीनंतर त्यामध्ये एजंटांचा वावर सुरू झाला. त्यांनी प्रत्येक आसनामागे (सीट) शंभर रुपये पाहिजेत, असा दम बसचालकांना भरण्यास सुरवात केली. त्यासाठी या एजंट लोकांनी एसटी महामंडळातील काही अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना हाताशी धरले. या अभद्र युतीपुढे खासगी बसचालकांना झुकावे लागले. स्थानकात तेच प्रवासी शोधून गाडीमध्ये भरू लागले. बसचालकांना तिकिटाचे पैसे देऊन वरचे पैसे खिशात घालण्यास सुरवात झाली आणि तेथून तिकिटाचे दर दुपटीने वाढले. 

पोलिस आणि एसटी महामंडळाकडूनच साथ मिळते म्हटल्यावर आज दिवसभर या एजंट लोकांनीच सर्व व्यवस्था हातात घेतली. आमच्याशिवाय थेट सीट भरायचे नाही, अशा पद्धतीने त्यांची दादागिरी सुरू झाली. दरम्यान, काल स्थानकात गाड्या उभ्या करण्यास परवानगी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि पोलिसांनी अचानकपणे भूमिका बदलत स्थानकात खासगी बसचालकांना बस घेण्यास बंदी घातली. विचारल्यानंतर स्थानकात गर्दी होते, असे कारण त्यांच्याकडून सांगण्यात येऊ लागले. मात्र, प्रत्येक बसमागे एक ते दोन हजार रुपये दिल्यानंतरच बस आतमध्ये सोडू, अशी मागणी त्यांच्याकडून आली. ती मान्य झाल्यानंतर खासगी बस आतमध्ये सोडण्यास सुरवात झाली. या सर्वांचा परिणाम बसच्या तिकीटवाढीत झाला. 

तिकीटदरात मोठी वाढ 
साधारणपणे 250 किलोमीटरसाठी एसटीकडून 380 रुपये भाडे आकारले जाते. खासगी बसचालकांकडून ते चारशे रुपये आकारण्यात येत होते. मात्र, मध्यस्तांची संख्या वाढल्यामुळे याच तिकीटाचे दर सहाशे रुपयांच्या वर गेल्याचे पाहावयास मिळाले. या सर्व प्रकारामध्ये सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. 

एसटी स्थानकांवर असा काही गैरप्रकार होत असेल, तर ते योग्य नाही. प्रवाशांनी पुढे यावे आणि तक्रार द्यावी. त्याची चौकशी करून दोषींवर काठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी देखील स्थानकांमध्ये कोणी एजंट असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. 
- डॉ. प्रवीण मुंढे (पोलिस उपायुक्त परिमंडल- 2) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com