गर्दीच्या मार्गांवर डेपोतून रिकामी बस सुटणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे विभागामध्ये असलेली प्रवासी मोठी संख्या आणि तुलनेने एसटी कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या ही एसटीसमोरील मोठी आव्हाने आहेत. पुण्यात सर्व वर्गातील प्रवासी आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून बालकांपर्यंत, आयटी वर्कर्सपासून ते अशिक्षितांपर्यंत सर्व वर्गातले लोक एसटीने प्रवास करतात. या सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी सेवा एसटीला पुरवावी लागणार आहे.
- श्रीनिवास जोशी, नियंत्रक, पुणे विभाग

पुणे - स्थानकातील प्रवाशांबरोबरच मार्गावरील विविध थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना एसटीची सेवा कशी उपलब्ध करून देता येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी महामंडळाच्या पुणे विभागाने विविध मार्गांवरील प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यानंतर ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असेल, त्या रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणाहून रिकामी बस सोडण्यात येणार आहे.

एसटीच्या पुणे विभागातून राज्यातील प्रत्येक मार्गावर गाड्या सोडण्यात येतात. मुंबई, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते; मात्र अनेकदा या मार्गांवरील सर्व एसटीगाड्या स्थानकांवरच फुल होतात. त्यामुळे मार्गावरील थांब्यावर एसटीची वाट पाहत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसण्यासाठी जागा मिळतच नाही. कित्येकदा गर्दीमुळे गाडीत प्रवेशच करता येत नाही.

अनेकदा गाडी फुल असल्यामुळे थांबतही नाही. त्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतूक सेवेचा लाभ या प्रवाशांना घेता येत नाही. या मार्गांवर स्थानकांतूनच प्रवाशांनी गाडी भरून जात असल्याने एसटी प्रशासनही मार्ग चांगला सुरू आहे, या विचाराने काम करते. या प्रकारामुळे रस्त्यावरील प्रवासी एसटीपासून दुरावत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातर्फे रस्त्यावरील प्रवाशांकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी काही मार्गांचे सर्वेक्षण सुरू आहेत. ते झाल्यानंतर मार्गावरील ठराविक ठिकाणांहून रिकाम्या गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती पुणे विभागाचे नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.

...तर अवैध वाहतुकीस आळा
ज्या प्रवाशांना एसटीने प्रवास करायचा आहे, ते प्रवासी एसटी स्थानकात येतात; मात्र अनेक प्रवाशांना एसटी स्थानकात येणे तितकेसे सोपे वाटत नाही. त्यामुळे रस्त्यावरील एखाद्या थांब्यावर उभे राहून ते एसटी किंवा खासगी वाहनाची वाट पाहतात. त्यांना एसटीपेक्षा खासगी वाहने लवकर उपलब्ध होतात. तसेच खासगी वाहनांमध्ये बसण्यास जागा मिळते, त्यामुळे हे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत आहेत. परिणामी खासगी अवैध वाहतुकीला चालना मिळत आहे. त्यामुळे या प्रवाशांना एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा या सर्वेक्षणामागील उद्देश आहे. एसटीची सेवा उपलब्ध झाल्यास आपोआपच अवैध वाहतुकीला आळा बसेल, असा दावाही श्रीनिवास जोशी यांनी केला.

Web Title: pune news st service