‘स्टार्टअप’चे स्वप्न साकारणार

बाणेर - शहरात मुख्यालय असलेल्या पहिल्या ‘व्हेन्चर कॅपिटल फंड’ची स्थापना झाली. फंड कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना कॅनडाचे मंत्री नवदीप बैन्स.
बाणेर - शहरात मुख्यालय असलेल्या पहिल्या ‘व्हेन्चर कॅपिटल फंड’ची स्थापना झाली. फंड कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना कॅनडाचे मंत्री नवदीप बैन्स.

पुणे - उद्योग क्षेत्रात केवळ नव्या कल्पना मांडून उपयोग होणार नाही, तर त्यासाठी भांडवलाची गरज असते. ही कमतरता भरून काढणारा उपक्रम आता सुरू झाला आहे. त्यामुळे स्टार्टअप सुरू करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे.

स्टार्टअप कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणाऱ्या आणि शहरात मुख्यालय असलेल्या पहिल्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ची स्थापना ‘ॲलॅक्रिटी इंडिया’तर्फे केली आहे. त्यामुळे शहरातील ‘बिझनेस टू बिझनेस’ (बीटूबी) आणि ‘सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस’ (सॅस) व्यावसायिक आराखड्यावर काम करणाऱ्या स्टार्टअपच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड ठरली आहे. कॅनडा येथील गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील ‘वेस्ली क्‍लोवर इंटरनॅशनल’ आणि पुण्यातील ‘आयडियाज टू इम्पॅक्‍ट’ या कंपन्यांच्या वतीने हा फंड स्थापन केला आहे. 

बाणेर रस्त्यावर तेरा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे कार्यालय असेल. स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीच्या प्रक्रियेला प्रत्यक्षात जानेवारी २०१८ पासून वेग येणार आहे. कॅनडाचे नावीन्यता, विज्ञान आणि आर्थिक विकास विभागाचे मंत्री नवदीप बैन्स यांच्या हस्ते कार्यालयाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक गीरेंद्र कसमाळकर, ॲलॅक्रिटी इंडियाचे पार्टनर सौरभ लाहोटी आदी उपस्थित होते. 

पुणे-स्थित व्हेंचर कॅपिटल फंडच्या महत्त्वाविषयी बोलताना कसमाळकर म्हणाले, ‘‘शहरातील स्टार्टअप परिसंस्था विकसित होत आहे. अनेक नवउद्योजकांसह, इन्क्‍युबेटर्स, मार्गदर्शक संस्था सध्या मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. पण या नवउद्योजकांना आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निधीच उपलब्ध नव्हता. ही उणीव ॲलॅक्रिटी इंडियाने भरून काढली आहे. केवळ गुंतवणूकच नाही, तर आम्ही स्टार्टअपसाठी इन्क्‍युबेटरही सुरू करत आहोत.’’

तंत्रज्ञानाधारित इंडिया स्टॅक प्लॅटफॉर्म (आधार, युपीआय, ई-साईन, ई-केवायसी, डिजिलॉकर), ‘बीटूबी’ आणि ‘सॅस’ स्टार्टअपवर आमचा विशेष भर असणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचलित व्यवसाय पद्धती बदलून टाकणाऱ्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त नागपूर येथील व्हीएनआयटी आणि हुबळी येथील बीव्हीबी महाविद्यालयांच्या मदतीने इन्क्‍युबेटर सुरू करण्याचाही आमचा विचार असल्याचेही कसमाळकर यांनी सांगितले.

एक कोटी डॉलरचा फंड 
देशातील गुंतवणूक-योग्य आणि शाश्‍वत कंपन्यांमध्ये व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी ‘ॲलॅक्रिटी इंडिया’ने एक कोटी डॉलरचा फंड उभारला केला आहे. पुण्याव्यतिरिक्त ॲलॅक्रिटीतर्फे कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड आणि तुर्की येथे अशाप्रकारचे फंड स्थापन केले आहेत. त्यामध्ये ३५ स्टार्टअप सध्या कार्यरत आहेत. भारतामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये मुख्यालय असलेल्या फंडची स्थापना होणे हे भारतीय स्टार्टअपच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. जागतिक बाजारपेठेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक योग्य स्टार्टअप आणि नवउद्योजकांना संधी देण्याचा ॲलॅक्रिटी इंडियाचा उद्देश आहे. देशातील गुंतवणूकदार, प्रस्थापित उद्योजक, कॉर्पोरेट्‌स आणि एंजल ग्रुप्स यांचाही सहभाग ॲलॅक्रिटी इंडियाच्या कार्यात राहणार आहे.

सॅस कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ : ५००० कोटी डॉलर 
भारतात सध्या कार्यरत असलेल्या सॅस स्टार्टअप  : ५०० 
जागतिक बाजारपेठेतील ८ टक्के हिस्सा काबीज करण्याचा भारतीय कंपन्यांचा आवाका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com