स्ट्रॉबेरीला फटका

स्ट्रॉबेरीला फटका

पुणे - परतीच्या पावसाचा फटका महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादनाला बसला आहे. फळ बाजारात मर्यादित आवक होत आहे; मात्र ती भविष्यात वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मार्केट यार्ड येथील घाऊक फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढू लागली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते. महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन जास्त होते. स्ट्रॉबेरीला मिळणारा भाव लक्षात घेऊन भोर तालुक्‍यातही त्याची लागवड सुरू झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो; परंतु या वर्षी परतीच्या पावसाने जास्त दिवस हजेरी लावल्याने सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीची रोपे पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर परिणाम झाला. तोडणीस आलेल्या मालाचे नुकसान झाले होते. त्या कालावधीत लागवड झालेल्या स्ट्रॉबेरीची आता वाढ होऊ लागली आहे. सध्या आकाराने लहान असलेली फळे बाजारात येत आहेत, असे शेतकरी नितीन भिलारे यांनी सांगितले. 

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड झालेल्या स्ट्रॉबेरीला पावसाचा फटका बसला. त्यामुळे दिवाळीतील पहिला बहार वाया गेला. त्यानंतर लागवड केलेल्या शेतकऱ्यांकडून सध्या माल बाजारात पाठविला जात आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी भागात सुमारे दोन ते अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड होते. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वाठार भागातही लागवड सुरू आहे.

फेब्रुवारीत माल बाजारात पाठविला जाईल, त्यानंतरचा तो प्रक्रिया उद्योगाकडे पाठविला जातो. फळ बाजारात मर्यादित आवक होत आहे; मात्र ती भविष्यात वाढेल, असाही अंदाज आहे. साधारणपणे जानेवारीच्या अखेरपर्यंत या भागातील स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो. तो या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत चालेल, अशी स्थिती आहे, असे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. घरगुती ग्राहकांबरोबरच प्रक्रिया उद्योगांकडून स्ट्रॉबेरीला मागणी आहे. चवीला आंबट गोड आणि लालसर आणि हिरवा देठ असलेल्या स्ट्रॉबेरीची छोट्या क्रेट्‌समधून विक्री होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com