‘अविरत’मधून घडते भविष्य

‘अविरत’मधून घडते भविष्य

पुणे - हुशार विद्यार्थी अशी अक्षयची शाळेत ओळख. पहिलीपासून ते सहावी-सातवीपर्यंत त्याचा आलेख चढताच होता. एरवी बोलका असणारा, आपले म्हणणे समोरच्याला पटवून देणारा अक्षय आठवीत असताना काहीसा अबोल झाला. त्याचे लक्ष काहीसे विचलित झाल्याचे शिक्षकांनी हेरले आणि वेळीच त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला. वयात येताना मानसिकतेत आणि शरीरात होणाऱ्या बदलांनी अस्वस्थ झाल्यामुळे तो काहीसा अबोल झाला होता. परंतु, शिक्षकांनी त्याला समजावून सांगितले आणि त्याला पुन्हा एकदा सूर गवसला.

अक्षयच्या शिक्षकांप्रमाणेच राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांमध्ये किशोरवयीन अवस्थेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना समजून घेऊन शिकविण्याचे आणि योग्य मार्गदर्शन करण्याचे कसब जागृत व्हावे, यासाठी  राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी ‘अविरत’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील सुमारे ४२ हजार शिक्षकांना ‘ऑनलाइन स्मार्ट क्‍लास’द्वारे टप्प्या-टप्प्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. राज्यातील जवळपास १७ हजार सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक यांना हे स्मार्ट प्रशिक्षण दिले जात आहे. किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी जागतिक संशोधन आणि माहितीवर आधारित हे प्रशिक्षण आहे. 

विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर म्हणाले, ‘‘किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक बदल समजून घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. हे समजून घेऊन त्यादृष्टीने उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण प्रकल्पाचे मॉडेल तयार केले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्यातून हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जात आहे. निवडण्यात आलेल्या शिक्षकांना विशिष्ट लॉग इन आयडी दिला आहे. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार हे प्रशिक्षण घेता येत आहे. यात ऑनलाइन व्हिडिओ, ऑडिओ, सादरीकरणाद्वारे शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.’’

परिचय व मार्गदर्शन, २१ व्या शतकातील बदल आणि शिक्षकांची भूमिका
किशोरावस्थेतील शारीरिक, मानसिक आणि वर्तनातील बदल आणि समस्या समजून घेणे किशोरवयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे तंत्र आणि कौशल्य
शिक्षकांच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण आणि त्यांच्या स्वविकासाचा कृती आराखडा
विद्यार्थ्यांचा कल, क्षमता, संधी ओळखून करिअर निवड आणि नियोजन

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होताना, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी हे ‘ऑनलाइन स्मार्ट प्रशिक्षण’ उपयुक्त ठरणार आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक यात सहभागी आहेत. यापूर्वी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शाळेबाहेर जावे लागायचे, परंतु शिक्षकांच्या सोयीनुसार हे प्रशिक्षण घेता येणार आहे. तसेच, कृती कार्यक्रम, प्रयोगात्मक शिक्षण याला प्राधान्य देणारे हे प्रशिक्षण आहे.
- जगदीश इंदलकर,  मुख्याध्यापक, के. व्ही. के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com