नगरच्या विद्यार्थिनीची पुणे विद्यापीठात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागात एमएस्सी करणाऱ्या रेश्‍मा रवींद्र गायकवाड (वय 22) या विद्यार्थिनीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच जीवनयात्रा संपविली. विद्यापीठाच्या वसतिगृह तीनमधील 50 क्रमांकाच्या खोलीत तिने गळफास घेऊन आज दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागात एमएस्सी करणाऱ्या रेश्‍मा रवींद्र गायकवाड (वय 22) या विद्यार्थिनीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच जीवनयात्रा संपविली. विद्यापीठाच्या वसतिगृह तीनमधील 50 क्रमांकाच्या खोलीत तिने गळफास घेऊन आज दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

रेश्‍माचा आज वाढदिवस होता. तिच्या रूममधील अन्य दोघींसह तिने मध्यरात्री बाराच्या सुमारास तो साजरा केला; पण आज तिच्या खोलीतील मुली बाहेर गेल्यानंतर तिने आत्महत्या केली. हे समजल्यानंतर वसतिगृहातील तिच्या अन्य मैत्रिणींना धक्का बसला. तिच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थिनींना वेगळ्या वसतिगृहात हलविण्यात आले. रेश्‍मा ही शांत स्वभावाची होती, असे सांगताना ती आता आमच्यात नाही, यावर विश्‍वास बसत नसल्याची भावना वसतिगृहातील विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

अभ्यासात हुशार
वनस्पतिशास्त्र विभागातही या घटनेमुळे शोककळा पसरली होती. विभागप्रमुख मालपाठक यांनी तिच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. शांत स्वभावाची, अभ्यासातही हुशार असणारी रेश्‍मा असे काही करेल यावर अजूनही विश्‍वास बसत नाही. एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. या वर्षाच्या तिसऱ्या सत्राचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यातही ती उत्तीर्ण झाली होती; पण अचानक तिच्या मृत्यू झाल्याचे समजल्याने हा सर्वांनाच मोठा धक्का आहे, असे त्या म्हणाल्या.

रेश्‍मा मूळची नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील होती. ती राहत असलेली खोली आतून बंद असून, ती दार उघडत नसल्याचे काही विद्यार्थिनींच्या लक्षात आले. त्यांनी प्रशासनाला सांगितल्यानंतर विद्यापीठाचा सुरक्षा विभाग, पोलिस यांनी दरवाजा उघडला. त्या वेळी तिने खोलीतील पंख्याला ओढणी लावून गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांच्या मदतीने तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठण्यात आला आहे.

रेश्‍माच्या खोलीत तिने लिहिलेली एक चिठ्ठी सापडल्याची चर्चा विद्यार्थिनींमध्ये होती. याबाबत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना विचारले असता ते म्हणाले, ""काही बाबी गोपनीय असल्याने त्याविषयी लगेच सविस्तर माहिती सांगता येणार नाही. याबाबत उद्या माहिती देण्यात येईल. तिच्या मृत्यूबाबत संशयास्पद काहीही आढळलेले नाही. व्यक्तिगत कारणातून तिने आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.''

Web Title: pune news student girl suicide