विद्यार्थी-शिक्षक प्रमाण कमी केल्याने चिंता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

विद्यार्थी संख्येमागील शिक्षकांचे प्रमाण कमी होणार, ही चिंता अनावश्‍यक आहे. त्यामुळे कोणताही शिक्षक सेवानिवृत्त झाल्याशिवाय किंवा त्याने राजीनामा दिल्याशिवाय शिक्षण संस्थांनी त्यांना कार्यमुक्त करू नये, अशा सूचना जारी केल्या आहेत.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

पुणे - अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती प्रमाणात शिक्षक असावेत, याचे प्रमाण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कमी केल्याने नोकऱ्यांवर संकट येण्याची चिंता शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कुणाच्याही नोकरीला धोका नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी १५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण होते. आता ते २० विद्यार्थ्यांमागे एक असे झाले आहे. परिषदेने त्यांच्या ‘हॅंडबुक’मध्ये हे प्रमाण दिल्यानंतर अनेक संस्थांनी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्ततेसाठी नोटिसा देण्यास सुरवात केली होती. त्यावर देशभरात टीकेची झोड उठली आहे. अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयीन लढा देण्याची तयारीदेखील केली होती. 

तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. सुभाष महाजन म्हणाले, ‘‘तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमामुळे शिक्षकांची संख्या कमी होऊ शकते. या निर्णयानुसार अनेक संस्थांनी शिक्षकांना नोटिसा देण्यास सुरवात केली होती; परंतु परिषदेने आता कुणालाही नोकरीवरून काढून टाकू नका, असे परिपत्रक प्रसिद्ध केल्याने दिलासा मिळणार आहे.’’

परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘शिक्षकांचे १ः२० हे किमान प्रमाण आहे. गेल्या वर्षी ते १ः१५ इतके होते. त्यात उद्योगांमधून अध्यापनासाठी येणाऱ्या तज्ज्ञांची संख्या समाविष्ट होती. या वर्षी बदल करताना अभ्यागत तज्ज्ञ अध्यापकांचे प्रमाण त्यात घेतलेले नाही. अभ्यागत तज्ज्ञ अध्यापक किती असावेत, याचे प्रमाण महाविद्यालये गरजेनुसार ठरवू शकतात. शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालये त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकतील. व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या कमी असेल, तर ते अभ्यासक्रम बंद करण्याचा पर्याय महाविद्यालयांकडे आहे.’’

राज्याची स्थिती
३५६  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्था
१६,000 अध्यापकांची संख्या (सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित)

Web Title: pune news student teacher percentage