सामान्य गणिताचे विद्यार्थी ‘द्विलक्ष्यी’ला अपात्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - दहावीमध्ये सामान्य गणित विषय घेतलेले विद्यार्थी अकरावीमध्ये द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पात्र नाहीत. हे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज करू शकतात; मात्र त्यांना या शाखांमध्ये गणित विषय घेता येणार नाही.

पुणे - दहावीमध्ये सामान्य गणित विषय घेतलेले विद्यार्थी अकरावीमध्ये द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पात्र नाहीत. हे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज करू शकतात; मात्र त्यांना या शाखांमध्ये गणित विषय घेता येणार नाही.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने ही माहिती पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केली आहे. व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक आणि दोन भरून सादर (सबमिट) करणे बंधनकारक आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व्यवसाय विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमामध्ये २५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. हे प्रवेशदेखील ऑनलाइन पद्धतीने होतील.

विद्यार्थ्यांना वैधानिक वा विशेष आरक्षणाचा लाभ घेऊन अकरावीत प्रवेश घ्यायचा असेल, तर आवश्‍यक दाखल्यांसह कागदपत्रे मुख्याध्यापकांना पडताळणीसाठी सादर करावी लागतील; अन्यथा विद्यार्थ्यांचा समावेश खुल्या वर्गात केला जाणार आहे. आरक्षित वर्गासाठी कोणकोणते प्रमाणपत्र आवश्‍यक आहेत, ते कोठे मिळतील, याची सविस्तर माहिती पुस्तिकेत दिली आहे.

चित्रकला प्रमाणपत्रासाठी 
चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्र किंवा त्याच्याच शाळेतील मुख्याध्यापकांकडून ही परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आरक्षणासाठी सादर करावे.
प्रमाणपत्र कोठे मिळेल : मुख्याध्यापकांचे प्रमाणित पत्र. 
विशेष आरक्षण.... कला व सांस्कृतिक आरक्षण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत, नृत्य कला प्रकार परीक्षेत उत्तीर्ण वा प्रावीण्य मिळविल्याचे प्रमाणपत्र.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त अभिनयाचे प्रमाणपत्र.
शास्त्रीय कला, चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनमान्य संस्थेची प्रमाणपत्रे.
प्रमाणपत्र कोठे मिळेल : संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी सही, शिक्‍क्‍यासह प्रमाणित करून दिलेले पत्र. 

क्रीडा आरक्षण
अकरावीसाठी या कोट्यातील प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवरील प्रथम वा द्वितीय क्रमांक मिळविलेला असावा. तसेच, भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय खेळ प्राधिकरणाच्या स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेतील पदकविजेता खेळाडू, राष्ट्रीय/राज्य स्पर्धेतील सहभागी खेळाडू असला पाहिजे.
प्रमाणपत्र कोठे मिळेल : जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे. मोबाईल : ९५५२०४५३४९, ७३५००६११०७.

प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त 
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र आणि आवश्‍यक कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक.
प्रमाणपत्र कोठे मिळेल : जिल्हा पुनर्वसन अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, पुणे.

सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य 
पालक सैनिकी सेवेत असल्याचा दाखला. माजी सैनिक असल्यास जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र वा सेवामुक्तीचा दाखला.

स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य  
स्वातंत्र्य सैनिकांवर अवलंबून असलेल्या किंवा स्वातंत्र्य सैनिकांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचे पाल्य. अकरावी प्रवेशासाठी त्याला आरक्षणाचा लाभ हवा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्‍यक.

दिव्यांग 
चाळीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक/अधिष्ठाता यांचे प्रमाणपत्र व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक.

Web Title: pune news students of general mathematics disqualified from dialectic