राज कपूर हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक - सुभाष घई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - 'माझ्या "गौतम गोविंदा' या चित्रपटातील एक गाणे राज कपूर यांना आवडले. माझा फोन नंबर मिळवून त्यांनी माझे खूप कौतुक केले. पुढे माझ्या कथेवर आधारित "खान दोस्त' चित्रपटासाठी त्यांना विचारणा केली. त्यांनी पटकथा वाचली. "माझ्या तारखा व मानधनाचा विचार सोडून दे' असे सांगत चक्क होकार दिला.'' अशा असंख्य आठवणींचा खजिना ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी सोमवारी खुला केला. 'चित्रपटातून सामाजिक प्रश्‍नांचा वेध घेताना त्यांनी निखळ मनोरंजनही केले. ते केवळ कलाकार नव्हे; तर तत्त्वज्ञानीही होते. म्हणूनच जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक होते,'' अशा शब्दांत राज कपूर यांच्यातील संवेदनशील माणूस आणि सर्वगुणसंपन्न कलाकाराचे पैलू घई यांनी उलगडले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "राज कपूर आणि त्यांचे चित्रपट' या विषयावर घई यांनी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

"राजसाहेबांचे चित्रपट मी लहानपणापासून पाहत होतो. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे मी त्यांच्याकडून शिकत गेलो. त्यामुळे ते माझे गुरू होते' अशी भावना घई यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ""राजसाहेबांचा स्वभाव खूप साधा आणि नम्र होता. राज कपूर यांची व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. गरीब, रिक्षावालाही आपला चित्रपट पाहील, या दृष्टीने कधी "राजू', तर कधी "जोकर' होऊन साधा माणूस त्यांनी पडद्यावर उभा केला. त्या दृष्टीने गरिबी, शोषण, सामाजिक विषमतेसारखे प्रश्‍न त्यांनी हलक्‍या-फुलक्‍या पद्धतीने मांडले.
"राज कपूर म्हणजे सत्यम, शिवम, सुंदरम' असे सांगत घई म्हणाले, ""काव्य, संगीत, नाटक व नृत्याचे एकत्रीकरण त्यांच्यासारखे फार कमी दिग्दर्शक करू शकले. लिखित पटकथेतून चित्रपट पडद्यावर नेण्यासाठी दिग्दर्शक संवेदनशील पाहिजे. ते राजसाहेबांकडे होते. त्यांची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. "मेरा नाम जोकर' चित्रपट मला सर्वश्रेष्ठ वाटतो; तर अभिनेते म्हणून "अंदाज' हा चित्रपट मला सर्वोत्कृष्ट वाटतो.''

पुण्याचे जावई
डॉ. जब्बार पटेल यांनी घई यांची "पुण्याचे जावई' अशी ओळख करून दिल्यानंतर घई यांनी तितकीच छान "स्माईल' दिली. "मला मराठी समजते. माझी बायको मराठी आहे; पण मराठी शिकविणारे पाहिजे' असे सांगत मराठीविषयीची आपुलकी घई यांनी व्यक्त केली. पुढे "आमची मुले कधी मोठी होतात, हे कळतच नाही. कामामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ते काम बायको प्रामाणिकपणे करते,'' असे सांगत मुलांना वेळ देता येत नसल्याची खंतही घई यांनी व्यक्त केली.

...आणि ऋषीने माफी मागितली!
'माझ्या "कर्ज' चित्रपटावेळी ऋषी कपूरला "एक हसीना थी' या गाण्याविषयी सांगायचे होते. तेव्हा तो म्हणाला "अरे यार तुझे म्युझिक की सेन्स तो है ना'. गाणे पूर्ण झाल्यावर ऋषीने ते चांगले झाल्याचे सांगत माझी माफीही मागितली. तो मनाने खूप निर्मळ आहे,'' अशी आठवणही घई यांनी सांगितली.

Web Title: pune news subhash ghai talking