सुभाषबाबू की रासबिहारी बोस?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

"एमपीएससी'च्या उत्तरसूचीमुळे पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर

"एमपीएससी'च्या उत्तरसूचीमुळे पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर

पुणे - शालेय जीवनापासून जे प्रश्‍न अनेकांना चुटकीसरशी माहिती असतात, तेच "एमपीएससी'च्या एखाद्या परीक्षेत आले की मात्र त्यांच्या "खरे-खोटेपणाबद्दल' काही खात्री देता येणार नाही, असेच म्हणण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या पूर्वपरीक्षेच्या उत्तरसूचीत "आझाद हिंद फौज'चे संस्थापक हे नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मात्र याचे उत्तर रासबिहारी बोस असे आहे !

एकीकडे शालेय पुस्तकात अधिकृतपणे (!) एक उत्तर दिलेले असताना एमपीएससीने मात्र आपल्या उत्तरतालिकेत दुसरेच उत्तर हे "योग्य उत्तर' म्हणून छापले असल्यामुळे, "सुभाषबाबू की रासबिहारी बोस ?' या प्रश्‍नाच्या संदिग्ध उत्तराभोवती हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एमपीएससीने मात्र पाठ्यपुस्तकातील चुकांकडे बोट दाखवत आपली बाजू सावरली आहे.

घडले काय ?
एमपीएससीची उत्पादन शुल्क विभागाची दुय्यम निरीक्षक पदासाठीची (गट क) परीक्षा यंदा 28 मे रोजी झाली. त्यात विचारलेल्या "आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते ?' या प्रश्‍नासाठी लक्ष्मी सहगल, लाला हरदयाल, सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस हे चार पर्याय उत्तर म्हणून दिले होते. परीक्षेनंतर तीन दिवसांनी 31 मे रोजी एमपीएससीने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेत या प्रश्‍नाचे "योग्य उत्तर' म्हणून सुभाषचंद्र बोस असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यानंतर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व आक्षेपांचे निरसन झाल्यानंतर 29 जुलै रोजी जाहीर झालेल्या अंतिम उत्तरतालिकेतही हेच उत्तर ठेवले आहे. मात्र, ज्यांनी रासबिहारी बोस हे उत्तर निवडले, त्या विद्यार्थ्यांना आयोगाची उत्तरसूची मान्य नाही. आठवीच्या पुस्तकाप्रमाणेच इतिहासाच्या इतर काही पुस्तकांतसुद्धा रासबिहारी बोस यांनाच आझाद हिंद फौजेचे संस्थापक म्हटले आहे.

विद्यार्थी म्हणतात :
एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवलाय काय ? मुळात जे प्रश्‍न संदिग्धता निर्माण करतात, ते प्रश्‍न स्पर्धा परीक्षांत ठेवावेच कशाला ? ते रद्द करा. अतिशय कमी वेळेत उपलब्ध प्रश्‍न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता यामुळे ही "संदिग्धता'ही सोडवत बसावी लागणार असे चित्र आहे ! जर शासनाच्या पुस्तकांतच चूक असेल तर आम्ही दाद मागायला जाणार तरी कुठे ?

परीक्षार्थी उमेदवारांनी पहिल्या उत्तरसूचीनंतर नोंदविलेल्या आक्षेपांच्या आधारे कार्यवाही करून तसेच विविध विषय तज्ज्ञांचे अभिप्राय लक्षात घेऊनच अंतिम उत्तरसूची तयार केली आहे. त्यात बदल करणे शक्‍य नाही. क्रमिक पाठ्यपुस्तकांत मात्र काही माहिती चुकीची असेल तर, त्या संदर्भात एमपीएससी काहीही करू शकत नाही.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी

Web Title: pune news Subhashababu or Rasbihari Bose?