रेशनवरील साखरेवर फुली
पूर्वी कार्डधारक : 3 लाख 68 हजार
आता फक्त अंत्योदय : 12 हजार 600
पूर्वी प्रतिव्यक्ती - 500 ग्रॅम
आता प्रतिकार्ड - 1 किलो
पुणे - राज्य सरकारने आता फक्त अंत्योदयच्या लाभार्थ्यांनाच रेशनवर साखर देण्याचा निर्णय घेतला असून, प्रतिकिलो पाच रुपयांची वाढही केली आहे. कोट्यातही कपात करण्यात आली असून, रेशनकार्डवर प्रतिमहिना फक्त एक किलोच साखर मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने ऐन दिवाळी- दसऱ्याच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांना दणका बसणार आहे.
रेशनकार्डावर वितरित करण्यात येत असलेली साखर खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येते. त्यासाठी केंद्र शासनाकडून राज्य सरकारला अनुदान दिले जाते. साखरेचा दर निश्चित करावयाचे अधिकार राज्याला देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने मध्यंतरी साखरेचा दर 15 रुपये प्रतिकिलो असा निश्चित केला.
दरम्यान, फक्त अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यासाठीच्या साखरेवर 18 रुपये 50 पैसे प्रतिकिलो असे अनुदान, तसेच प्रतिव्यक्ती 500 ग्रॅमवरून प्रत्येक कार्डधारकाला 1 किलो साखर देण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने मे महिन्यात घेतला.
केंद्र शासनाच्या या धोरणामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी साखरेचे प्रमाण आणि दराचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने उपसमिती नेमली. या समितीच्या निर्णयानुसार अंत्योदयच्या लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब दरमहा 1 किलो याप्रमाणे साखर वितरित करण्याचा आणि दर हा 15 रुपये प्रतिकिलोऐवजी 20 रुपये निश्चित केला आहे. अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना प्रतियुनिट अर्थात प्रत्येक व्यक्तीला दरमहा 500 ग्रॅम याप्रमाणे साखर वितरित करण्यात येत होती. बीपीएल कार्डधारकांना मिळणारी साखर यापूर्वी बंद करण्यात आली. आता अंत्योदय लाभार्थ्यांच्या कोट्यातही कपात झाली आहे.
प्रत्येक कार्डावर एक किलोच!
ऐन दसरा- दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या कोट्यात कपात केली, तसेच साखरेचा दरही वाढविला आहे. सध्याच्या नियमानुसार कुटुंबात चार माणसे असतील तर महिन्याला दोन किलो साखर आणि सहा माणसे असतील तर तीन किलो साखर प्रतिमहिना मिळत होती. आता शासनाने एका रेशनकार्डवर फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुन्हा दरवाढ
राज्य सरकारने रेशनकार्डातील साखरेच्या दरात एप्रिल महिन्यात दीड रुपयाने वाढ केली होती. पूर्वी साडेतेरा रुपये प्रतिकिलो या दराने मिळणारी साखर 15 रुपये किलो या दराने मिळण्यास सुरवात झाली होती. त्यामध्ये आता आणखी पाच रुपयांनी वाढ केल्यामुळे ती आता वीस रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे.