'निर्माते, दिग्दर्शकांनी जबाबदारीने काम करावे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पुणे - ‘‘अलीकडे भारतीय चित्रपटांमध्ये हिंसा आणि लैंगिकतेचे भडक चित्रण केले जात आहे. मानवी जीवनाकडे विशेषत: महिलांकडे सन्मानपूर्वक पाहण्यास शिकवते, तीच एक उत्कृष्ट कलाकृती असते. डिजिटायझेशनच्या काळात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी अधिक जबाबदारीने काम केले पाहिजे,’’ असे मत दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.

रेसिडेन्सी क्‍लबच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘पुणे प्राइड’ पुरस्कार कार्यक्रमात उद्योजक बाबा कल्याणी यांच्या हस्ते भावे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या लीला पूनावाला, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ब्रह्माकॉर्प लिमिटेडचे ग्रुप चेअरमन आर. के. अगरवाल, बाहरी मल्होत्रा उपस्थित होते. या वेळी गौरी गाडगीळ (क्रीडा), हणमंत गायकवाड (कॉर्पोरेट), डॉ. विनोद शहा, मीना शहा (सामाजिक कार्य), उस्मान खान (कला आणि संस्कृती), प्रा. एम. एस. वाडिया (शिक्षण) यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी रोलर स्केटर साक्षी माथूर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

भावे म्हणाल्या, ‘‘गेली अनेक वर्षे प्रतिमांच्या जगात स्वैरपणे वावरल्यानंतर या क्षणाला केवळ एकच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, ती म्हणजे एक स्त्री. जिच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब टपकताहेत आणि त्या प्रत्येक थेंबात संबंध विश्‍व सामावलेले असल्याचे दिसते.’’ 

कल्याणी म्हणाले, ‘‘सामान्य माणसांमधील असामान्य व्यक्तींना शोधून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम रेसिडेन्शिअल क्‍लब करत आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.’’

Web Title: pune news Sumitra Bhave