'सक्ती करून देशप्रेम वाढत नाही!'

'सक्ती करून देशप्रेम वाढत नाही!'

विविध चित्रपट-लघुपटांच्या माध्यमातून तुम्ही समाजदर्शन घडविले आहे. आता या टप्प्यावर कोणते संकल्प तुम्ही केले आहेत? चित्रपटासाठी कुठला विषय खुणावतो आहे?
- कुठलाही चित्रपट कोणा एकट्यामुळे तयार होत नाही. भोवतालच्या वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने, त्यांच्या कौशल्याने तो आकाराला येतो, याचे मला भान आहे. त्यामुळे चित्रपटविषयक आठवणी लिहिण्याचा विचार आहे; पण ते आत्मचरित्र नसेल. चित्रपटाबाबत म्हणाल तर सध्या मला विनोबा भावे यांची भूदान चळवळ हा विषय खुणावतोय. कुठलीही सक्ती नव्हती. कुठलाही कायदा नव्हता. तरीही गरीब-श्रीमंत एकत्र आले. विनोबांनी केवळ आवाहन केले होते. त्यानंतर माणसाच्या चांगुलपणाला मिळालेला तो प्रतिसाद होता. सध्याच्या काळात हे नको, ते नको...कधी यावर सक्ती, तर कधी त्यावर सक्ती... अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. अशा स्थितीत एकत्र येण्याचा विचार पुढे आला पाहिजे.

 कलाकृतींवरील बंधने वाढत चालली आहेत. मग चित्रपट असेल किंवा एखादी साहित्यकृती, याकडे तुम्ही कसे पाहता?
-समाजात सध्या सक्तीचे वातावरण आहे. यातून कलाकृतीसुद्धा सुटलेल्या नाहीत. अशी सक्ती मला बिलकूल पटत नाही. राष्ट्रगीत सुरू झाले की उभे राहा, असे सांगितले जाते. तुम्ही अशा पद्धतीने सारखी-सारखी बंधने घालायला लागलात, की लोकांना वैताग येतो. त्यामुळे मला बंधने अजिबात मान्य नाहीत. माणसाला बंधने घालण्यापेक्षा त्याला स्वतंत्र ठेवले पाहिजे. न्याय ही गोष्ट सक्तीने होत नाही किंवा सक्ती करून देशप्रेम वाढत नाही. हे आपल्याला कळले पाहिजे; पण नेमके उलटे घडताना दिसत आहे.

 सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना तुम्ही चित्रपट या माध्यमाकडे वळलात. चित्रपटाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन, असाच यामागे विचार होता?
- अर्थातच...! चित्रपटातून समाजपरिवर्तन होऊ शकते, यावर माझा विश्‍वास आहे. समाजपरिवर्तनाचे हे फारच प्रभावी माध्यम आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आपण फक्त उपदेश करायचे, असे नाही आणि केवळ भडक करमणूक करायची, असेही नाही. अतिशय प्रामाणिकपणे, साध्या-साध्या गोष्टी आपण सांगितल्या तर प्रेक्षकांना आपण ‘आरशात पाहत आहोत’, असेच वाटत राहते. चित्रपटांतून एखादा विषय समोरच्यांच्या भावनेला, हृदयाला भिडतो. त्यातून कृती बदलते. माणूस वेगळा विचार करू लागतो. हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.

 पारंपरिक चौकटीत अडकलेला मराठी चित्रपट बाहेर पडतोय, असे वाटते का?
- तो चौकटीबाहेर पडलेला आहे. अनेक तरुण दिग्दर्शक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. मी सतत या तरुण कलावंतांच्या संपर्कात असते. ते वेगवेगळे विषय विचारपूर्वक मांडत आहेत. त्यांचे कौतुक आपण करायला हवे. कारण अशा प्रयत्नांमुळे कलात्मक चित्रपटांचा प्रेक्षक तयार होत आहे. ही फार चांगली बाब आहे. वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षक मराठी चित्रपट पाहतात. ‘तुमचा चित्रपट आवडला’, असे सांगतात त्या वेळी फार बरे वाटते.

 पुरस्कारासाठी चित्रपट, अशी एक प्रथा पडत चालली आहे, असे काही कलावंत सांगतात.
- चित्रपट आपण बनवत असतो त्या वेळी पुरस्काराचा काहीही संबंध नसतो. हा विचार डोक्‍यातसुद्धा येत नाही. इतके आम्ही कलाकृतीच्या निर्मितीत गुंतलेलो असतो. संपूर्ण बुडून गेलेलो असतो. किती पुरस्कार मिळतील, किती कमाई होईल...या आकडेवारीकडे चांगल्या दिग्दर्शकाचे कधीही लक्ष नसते. त्याला खरा आनंद प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत असतो. तीच खरी कमाई असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com