उन्हाळ्यात पाणी फोडणार घाम!

Water
Water

पुणे - उन्हाळ्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी लागणार असल्याचे पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठविलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.  महापालिका आणि पाटबंधारे यांच्यात पाणीबिलावरून वाद सुरू आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेवर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारेने दिला होता. त्याचे पडसाद शहरात उमटले होते. ते शांत होत नाहीत, तोच पाटबंधारेने नव्याने पत्र पाठवून महापालिकेकडून दररोज मान्यतेपेक्षाही ३०० एमएलडी जादा पाण्याचा वापर होत असल्याचा दावा केला आहे. यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

मान्यतेपेक्षा जास्त वापर
पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांतून महापालिकेस करारानुसार वर्षासाठी ११.५० टीएमसीचा कोटा मंजूर आहे. यानुसार पाणीवापर दररोज ९०० एमएलडी इतका होणे अपेक्षित आहे. परंतु नोव्हेंबर २०१७ च्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराची गरज लक्षात घेऊन प्रतिदिन १३५० एमएलडी पाणी वापरास मान्यता देण्यात आली आहे. असे असतानाही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दैनंदिन १६०० एमएलडीपेक्षा जास्त पाणीवापर झाल्याचे पाटबंधारेचे म्हणणे आहे. महापालिकेकडून जानेवारीत १.७५ टीएमसी, तर फेब्रुवारीत १.५१ टीएमसी पाणीवापर झाल्याचे पाटबंधारेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

पाणी वापरावर नियंत्रण आणा
१५ जुलैपर्यंत खडकवासला धरण साखळीतील चार प्रकल्पांतील पाणीसाठा हा पुण्यातील सुमारे चाळीस लाख लोकसंख्या आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरविणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तने देण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने बेमुसार पाणीवापर न थांबविल्यास ऐन उन्हाळ्यामध्ये शहर व ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यताही पत्रात वर्तविली आहे. यावरून महापालिकेला अप्रत्यक्ष पाणीकपात करण्याची सूचना पाटबंधारेने केली असल्याचे बोलले जात आहे.

असा काढला वर्षाचा हिशेब
पुणे महापालिकेच्या पाणीवापर मीटरमधील नोंदीनुसार बुधवारी (ता. १४) महापालिकेकडून १६८२ एमएलडी आणि गुरुवारी (ता. १५) १६५३ एमएलडी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. यावरून ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा महापालिकेकडून दररोज ३०० एमएलडी जास्त वापरण्याचा वापर होत आहे. याचा हिशेब केला, तर महापालिकेकडून वर्षाचा पाणीवापर २० टीएमसीपेक्षा जास्त होत असल्याचा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे.

अशी होऊ शकते पाणीबचत
शॉवरऐवजी बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा
फ्लशचा वापर टाळा
नळगळती दुरुस्त करा
नळ सतत सुरू ठेवून तोंड धुऊ नका
वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे टाळा
सार्वजनिक नळकोंडाळी दुरुस्त करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com