गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहू - कुलगुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप
पुणे - 'पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासाने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या निमित्ताने समाजात पोलिसांची प्रतिमा उजळण्याचे काम होत आहे. या गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सदैव पाठीशी राहील,'' असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने गुरुवारी (ता. 13) शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात शैक्षणिक पालकत्व योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. विघ्नहर्ता न्यासाच्या अध्यक्षा पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, न्यासाचे सचिव पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली, विश्‍वस्त राजीव साबडे, डॉ. मिलिंद भोई, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, प्रा. जगदीश चिंचोरे, इसाक जाफर, प्रताप निकम, दिलीप कामत, पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे, दीपक साकोरे, गणेश शिंदे, संजय बाविस्कर, ज्योतीप्रिया सिंह, डॉ. प्रवीण मुंढे, शेषराव सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.

न्यासाच्या वतीने दीडशे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनीही विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. न्यासाचे सचिव डॉ. तेली यांनी प्रास्ताविकात हा उपक्रम आणखी व्यापक करणार असल्याचे नमूद केले. पल्लवी हंगरगे, ऊर्मिला भगत आणि गोमती साहू या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ. भोई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेमचंद्र मासुळकर यांनी आभार मानले.

Web Title: pune news Support with the poor students