बायोमेट्रीक प्रणाली ऐवजी इतर प्रणालीचा वापर करावा: सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

दिल्ली येथे सुळे यांनी जेटली यांची भेट घेऊन ही मागणी केली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात सुप्रिया सुळे यांनी असे नमूद केले आहे की, कष्टाची कामे केल्यामुळे अनेक शेतक-यांच्या अंगठ्यावरच्या रेषा पुसट झालेल्या असतात व बायोमेट्रीक प्रणालीमध्ये अंगठा न जुळल्याने अशा लोकांना निवृत्ती वेतन तसेच धान्य मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांकडे आधारकार्ड नाहीत, आधारकार्ड काढण्यासाठी जवळ यंत्रणा उपलब्ध नाही तर काही ठिकाणी काही लोकांच्या बोटांचे ठसेही घेणे अशक्य झाल्याची काही उदाहरणे झालेली आहेत.

बारामती : ज्येष्ठ नागरिक व वयोवृध्द शेतकऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन तसेच धान्य मिळविताना बायोमेट्रीक प्रणालीमुळे कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्या मुळे अशा बाबतीत बायोमेट्रीक प्रणाली ऐवजी इतर प्रणालीचा वापर करुन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. 

दिल्ली येथे सुळे यांनी जेटली यांची भेट घेऊन ही मागणी केली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात सुप्रिया सुळे यांनी असे नमूद केले आहे की, कष्टाची कामे केल्यामुळे अनेक शेतक-यांच्या अंगठ्यावरच्या रेषा पुसट झालेल्या असतात व बायोमेट्रीक प्रणालीमध्ये अंगठा न जुळल्याने अशा लोकांना निवृत्ती वेतन तसेच धान्य मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांकडे आधारकार्ड नाहीत, आधारकार्ड काढण्यासाठी जवळ यंत्रणा उपलब्ध नाही तर काही ठिकाणी काही लोकांच्या बोटांचे ठसेही घेणे अशक्य झाल्याची काही उदाहरणे झालेली आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या सर्व प्रणालीची सवय नसल्याने त्यांना त्यांचे निवृत्ती वेतन काढणे अशक्य होऊन बसले असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

अर्थमंत्र्यांनी या संदर्भात राज्य सरकार व संबंधित यंत्रणांना या बाबत सूचना द्याव्यात व या वर कायमस्वरुपी उपाय योजणे अवघड असल्यास किमान तात्पुरत्या स्वरुपात काही उपाययोजना करुन ज्येष्ठ नागरिक व वयोवृध्द शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात केली आहे. 

सुळे यांच्या या मागणीबाबत संबंधित यंत्रणांशी बोलून काय मार्ग काढता येईल या बाबत निश्चित उपाययोजना करु अशी ग्वाही अरुण जेटली यांनी दिली आहे.

Web Title: Pune news Supriya Sule meet Arun Jaitly biometric system