रेल्वेशी संबंधित मागण्यांबाबत विचार; सुप्रिया सुळेंनी घेतली गोयल यांची भेट

मिलिंद संगई
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेशी संबंधित विविध मागण्यांचे पत्र आज सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांना दिल्ली येथे प्रदान केले. या मध्ये दौंड, बारामती, जेजुरी, नीरा रेल्वे स्थानकांच्या विविध प्रश्नांबाबत सुळे यांनी गोयल यांच्याशी चर्चा केली. 

बारामती : रेल्वेशी संबंधित सर्व मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करुन निर्णय घेतले जातील अशी ग्वाही नवनियुक्त रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिली. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेशी संबंधित विविध मागण्यांचे पत्र आज सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांना दिल्ली येथे प्रदान केले. या मध्ये दौंड, बारामती, जेजुरी, नीरा रेल्वे स्थानकांच्या विविध प्रश्नांबाबत सुळे यांनी गोयल यांच्याशी चर्चा केली. 

बारामती नगरपालिकेने सेवा रस्त्याचा प्रस्ताव सादर केला असून त्याला त्वरित मान्यता देण्याची मागणी सुळे यांनी केली. या शिवाय शिरसाई, मळद येथील फलाटाची उंची वाढविणे, बारामती रेल्वे स्थानकावरील सुविधा, जेजुरी नीरा मार्गावर गेट क्रमांक 25 नजिक भुयारी मार्ग तयार करणे, नीरा रेल्वे स्थानकाबाहेरील रेल्वेच्या जागेचा व्यापारी वापर करणे, नीरा व जेजुरी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे अशा अनेक मागण्यांचा या पत्रात समावेश आहे.

दौंड रेल्वे स्थानकावर शताब्दी, सोलापूर मुंबई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, चेन्नई मुंबई एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा दयावा अशीही मागणी त्यांनी केला. पुणे-जेजुरी-नीरा अशी रेल्वेची शटल सेवा सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी असून त्याकडे सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

नवीन मार्गाचीही मागणी
पुणे-सासवड-जेजुरी-मोरगाव-बारामती असा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी आज पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली. जेजुरी आणि मोरगाव ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात, त्यांच्या सोयीसाठी असा मार्ग करण्याचा विचार करावा असे त्या म्हणाल्या. 

पूलाच्या तपासणीची मागणी
दौंड ते सोलापूर मार्गावर भीमा नदीवरील पूल जुना झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने या पूलाची तपासणी करुन आवश्यक उपाययोजना व्हाव्यात अशीही मागणी त्यांनी केली. दौंड ते बारामती लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने मार्गी लावण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

Web Title: Pune news Supriya Sule meet Railway minister Piyush Goyal