शस्त्रक्रियेद्वारे काढली घशात अडकलेली ‘सेफ्टी पिन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - दोन वर्षांची चिमुकली खेळत असताना तोंडात असलेली सेफ्टी पिन घशात रुतून बसली. तिच्या आईने तिला तातडीने ससून रुग्णालयात आणले असता, दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी) शस्त्रक्रिया करून घशातील पिन काढण्यात यश मिळाले. त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

पुणे - दोन वर्षांची चिमुकली खेळत असताना तोंडात असलेली सेफ्टी पिन घशात रुतून बसली. तिच्या आईने तिला तातडीने ससून रुग्णालयात आणले असता, दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी) शस्त्रक्रिया करून घशातील पिन काढण्यात यश मिळाले. त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

पिंपरी- चिंचवड येथील रहिवासी असलेल्या पूजाच्या (नाव बदललेले आहे) घशात सेफ्टी पिन गेली. ती पिन उघडी असल्यामुळे घशात अडकून पडली. तिच्या आईने तिला ससूनमध्ये आणले. डॉक्‍टरांनी पाहणी केली असता, तिचा श्‍वास आणि कानाचे कार्य व्यवस्थित सुरू होते. परंतु तिच्या तोंडात काही वेळांनी लाळ साठत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिच्या छातीचा एक्‍सरे काढल्यानंतर सेफ्टी पिन घशात अडकल्याचे दिसून आले. ही पिन उघड्या अवस्थेत असल्यामुळे घशातील मांसल भागाला चिकटलेली होती. त्यानंतर तिला भूल देऊन दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी) शस्त्रक्रिया करून पिन काढण्यात आली. या वेळी तिच्या घशामध्ये रक्तस्राव झाला नाही. चोवीस तास निरीक्षणानंतर पूजाला घरी सोडण्यात आले. 

ससून रुग्णालयाच्या नाक, कान व घसा विभागप्रमुख डॉ. समीर जोशी, डॉ. सोनाली देवांग आणि भूलतज्ज्ञ डॉ. नीरज नलावडे यांनी ही शस्त्रक्रिया केली.

पिन उघडी असल्यामुळे पोटात गेली असती, तर तिचे आतडे फाटण्याची शक्‍यता होती. सुदैवाने तसे काही झाले नाही. तत्पूर्वी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. दरवर्षी एक तरी सेफ्टी पिन गिळलेला रुग्ण ससूनमध्ये येतो. साधारणतः पाच ते आठ वयोगटातील लहान मुले सर्वाधिक असतात. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अवघड असते.
- डॉ. राहुल ठाकूर, नाक, कान, घसा विभाग, ससून रुग्णालय

Web Title: pune news surgery safety pin sasoon hospital