"स्वॅप मशिन'कडे पाठ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - काही भाजीपाला विक्रेत्यांनी नोटाबंदीनंतर "स्वॅप मशिन'चा वापर सुरू केला होता. पण आता तो कमी झाला आहे. किरकोळ "बिल' होत असल्याने ग्राहकदेखील "कार्ड'चा वापर करीत नाहीत, असा अनुभव भाजीपाल्याचे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी नमूद केले. 

पुणे - काही भाजीपाला विक्रेत्यांनी नोटाबंदीनंतर "स्वॅप मशिन'चा वापर सुरू केला होता. पण आता तो कमी झाला आहे. किरकोळ "बिल' होत असल्याने ग्राहकदेखील "कार्ड'चा वापर करीत नाहीत, असा अनुभव भाजीपाल्याचे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी नमूद केले. 

गेल्या वर्षी केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला होता. चलन तुटवड्यामुळे नागरिक "कॅशलेस' व्यवहाराकडे वळू लागले होते. यामुळेच भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रेत्यांनी "स्वॅप मशिन', तर काहींनी "पेटीएम'चा वापर करण्यास सुरवात केली होती. जसे जसे बाजारात नवीन चलन येऊ लागले आणि सुट्या पैशांचा प्रश्‍न मार्गी लागला तसा "स्वॅप मशिन'चा वापर आणि "कॅशलेस'चे प्रमाणही कमी झाले. 

विक्रेते ढमढेरे म्हणाले, ""नोटीबंदीच्या कालावधीत "कॅशलेस' व्यवहार झाला. पण भाजीपाला विक्रीत तुलनेत त्याचे प्रमाण कमीच होते. आमच्या दुकानात भाजीपाल्याबरोबरच ग्राहकांची गरज म्हणून इतरही वस्तू ठेवतो. त्यामुळे "स्वॅप मशिन' घेतले होते. चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. दोनशे आणि पन्नासच्या नोटाही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा वापर कमी झाला आहे. नोटा बाजारात आणखी आल्यावर "कॅशलेस' आणखी कमी होईल.'' 

""नाशवंत माल असल्याने भाज्याची विक्री लवकर करावी लागते. दररोजची खरेदी करावी लागते. घाऊक व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करताना आम्हाला रोख पैसे मोजावे लागतात. किरकोळ विक्रीतून रोज जमा होणारी रक्कम, नफा वगळून मालाची खरेदी करावी लागते. त्यासाठी रोज हातात रोख रक्कम लागते. "कॅशलेस'मध्ये बॅंकेतून पैसे काढून ते घाऊक विक्रेत्याला द्या, अशा पद्धतीने काम करावे लागते. व्यवहारात पैसा हातात नसतो. यामुळे भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रेत्यांकडून "स्वॅप मशिन'चा वापर जास्त झाला नाही. ज्यांनी केला त्यांच्याकडेही या पद्धतीचा व्यवहार कमीच आहे. "कॅशलेस' खरेदी ही मॉलमध्येच करण्यावर ग्राहकांचा भर असतो,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news swap machine