स्वारगेट ते कात्रज मेट्रोही भूमिगत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

पुणे - नियोजित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग भुयारी असेल. त्यानुसार कृषी महाविद्यालयाच्‍या मागील बाजू ते कात्रज हा दहा किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी होणार आहे. या कामांच्या हालचालींना महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवर गती मिळाली आहे. या मार्गाची पाहणी करून लवकरच त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गांची कामे सुरू झाली आहेत. त्यानुसार या मार्गांवर खांब (पिलर) आणि ‘क्‍लस्टर यार्ड’ उभारण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम करता येणे शक्‍य असल्याचे मेट्रो प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागाराने एका अहवालात म्हटले आहे. प्रस्तावित दोन्ही मार्ग उपनगरांना जोडून वर्तुळाकार मेट्रो उभारण्याचे नियोजन आहे.

कात्रज मार्गांची चाचपणी होणार
पहिल्या टप्प्यात कात्रजपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव करण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकार आणि महापालिका यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून, त्याच्या अहवालासाठी सुमारे ३० लाख रुपये देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. महामेट्रोच्या प्रमुख अभियंत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या मार्गांची चाचपणी करण्यात येणार आहे.

जमिनीची कंपन चाचणी
मूळ पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील खडकी येथील अंडी उबवणी केंद्रापासून स्वारगेटपर्यंतचा पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. त्यासाठी जमिनीची ध्वनी आणि कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ कात्रजपर्यंतच्या मार्गाचीही चाचणी होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

भुयारी मार्ग तांत्रिकदृष्ट्या सोयीचा
शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावरील मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याचे नियोजन असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. स्वारगेटपर्यंत भुयारी मेट्रो असल्याने त्यापुढील टप्पाही याच पद्धतीने करणे तांत्रिकदृष्ट्या सोयीचे असेल. याबाबत महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली आहे. पुढील कार्यवाही वरिष्ठ पातळीवर होईल, असे महामेट्रोच्‍या वतीने सांगण्यात आले.

Web Title: pune news swargate to katraj metro underground