गुणवंतांचा सत्कार, स्वच्छ भारत अभियान आणि मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

स्वागत समारंभ
एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्रशासकीय अधिकारी अभिजित पवार, प्रा. पूजा अवस्थी, ज्योती कणसे उपस्थित होते.

स्वागत समारंभ
एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्रशासकीय अधिकारी अभिजित पवार, प्रा. पूजा अवस्थी, ज्योती कणसे उपस्थित होते.

माजी विद्यार्थी मेळावा
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अध्यापक महाविद्यालयामध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ घेण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच ‘आठवणींचा उजाळा’ चित्रफीत दाखविण्यात आली. 
या वेळी डॉ. प्रसाद जोशी, डॉ. शिवप्रसाद घालमे, डॉ. सुनील पवार, विक्रम काळे, संदीप निकम उपस्थित होते. 

जीएसटीवर कार्यशाळा
‘‘वस्तू व सेवाकराची (जेएसटी) व्याप्ती पाहता सर्व स्तरांवरील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक हे कायद्याच्या मुख्य प्रवाहात येतील, त्यामुळे कर कायद्याची अंमलबजावणी सोपी व सुटसुटीत होईल,’’ असे मत कर सल्लागार ॲड. महेश भागवत यांनी व्यक्त केले. बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या इकॉनॉमिक्‍स आणि अकाउन्टस विभागातर्फे ‘वस्तू व  सेवाकर’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक डॉ. अभय टिळक, जनवित्त अभियानाचे प्रमुख डॉ. अजित अभ्यंकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, विभागप्रमुख डॉ. शैलजा देसाई, यशोधन महाजन उपस्थित होते. 

‘स्वच्छ भारत’ अभियानाला प्रतिसाद 
यतिमखाना अँड मदरसा अंजुमन खैरूल इस्लाम शिक्षण संस्थेचे पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्समधील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘स्वच्छ व स्वस्थ भारत’ अभियान राबविण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख म्हणाले, ‘‘ओला व सुका कचरा वेगळे ठेवणे आवश्‍यक आहे. कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो.’’ या अभियानात एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपप्राचार्य प्रा. मोईनुद्दिन खान, प्रा. इक्‍बाल एन. शेख, प्रा. जमीर सय्यद, प्रा. स्वालेहा मुल्ला, डॉ. साजिद हुंडेकरी उपस्थित होते. 

‘सोलर पॉलिसी’वर व्याख्यान
राजीव गांधी अक्षय ऊर्जादिनानिमित्ताने ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे अपारंपरिक ऊर्जा मंडळांतर्गत ‘सोलर पॉलिसीज फॉर इंडिया’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे मुख्य व्यवस्थापक किशोर शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते, तसेच ‘अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर’ या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या वेळी प्राचार्य डॉ. प्रदीप माने, विभागप्रमुख संदीप चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओंकार झांजे व विक्रम मिश्रा यांनी केले. ऋतुजा गाडगीळ यांनी आभार मानले.  

आभासी नातेसंबंध धोकादायक : डॉ. देशमुख 
‘‘आभासी नातेसंबंध धोकादायक असतात. वॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट यामुळे आजची तरुणाई खऱ्या नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करीत आहे. आदर, प्रेम, विश्‍वास व एकामेकाविषयीची काळजी यावर नातेसंबंध टिकून असतात. मोह आणि प्रेम यामधीलफरक समजावून घेतला पाहिजे.’’ असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी व्यक्त केले. कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या महिला मंचतर्फे ‘महिला आणि महिलांचे आरोग्य’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. डॉ. विद्या जोशी, डॉ. वैशाली देशमुख, डॉ. विदुल्लाता देशपांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. उपप्राचार्या सुचिस्मिता मोहंती उपस्थित होत्या. सूत्रसंचालन श्वेता भगत यांनी केले. तर मानसी जोशी यांनी आभार मानले. 

प्रत्युष दासचे यश
बी. जे. मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित वेदांत उपक्रमात ‘माय स्टोरी’ या चित्रकला स्पर्धेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्रत्युष दास याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने रेखाटलेले चित्र समाजातील अत्याचार या विषयावर होते. ‘समाजात कृष्णकृत्ये होत असताना दोषी निसटून जातात, आपण डोळे मिटून बसतो,’ असा या चित्राचा आशय असल्याचे प्रत्युष दास याने सांगितले. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी प्रत्युषचे अभिनंदन केले.

अल्पसंख्य समाजातील गुणवंतांचा सत्कार  
अवामी महाज संस्था आणि हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट वतीने अल्पसंख्य समाजातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. पी. ए.  इनामदार, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष  विनोद मथुरावाला आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांना ‘फक्र -ए -पुणे’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘फ्रेंडशिप सॅटेलाइट ’या ‘नासा’च्या  प्रकल्पासाठी निवड झालेल्या ओ. एस. इनामदार आणि बाकीर सय्यद यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी राज्यातील आठ विभागीय मंडळांतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला. कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजू सेठी, लतीफ मगदूम, अतुल गायकवाड, झुबेर  शेख, शेख चांद सरदार, एड. अयुब शेख, वाहिद बियाबानी, मुनावर शेख आदी उपस्थित होते. 

प्रदर्शन, पथनाट्यातून जागृती
क्विकहील फाउंडेशन व पंख सामाजिक संस्थेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयात ‘प्रेम, मैत्री, आकर्षण, बाललैंगिक अत्याचार व व्यसन’ याविषयी पोस्टर प्रदर्शन व पथनाट्याच्या माध्यमातून जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले व पोलिस उपनिरीक्षक आशीर्वाद शिंदे यांनी बाललैंगिक शोषणामध्ये पोलिसांची व कायद्याची भूमिका याविषयी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच पंख संस्थेच्या अध्यक्ष स्मिता आपटे यांनी ‘प्रेम, मैत्री, आकर्षण’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

पालकांसाठी प्रेरणा सत्र
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी प्रेरणा सत्र व स्वागत समारंभ आयोजिला होता. या वेळी फोर्ब्स मार्शलचे जनरल मॅनेजर सी. एस. धामणकर, संस्थेचे संयुक्त सचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, सभासद साहेबराव जाधव उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी महाविद्यालयातील सुविधांचा परिचय करून दिला. 

स्वच्छतेविषयी जनजागृती
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आदर पूनावाला फाउंडेशन यांच्या वतीने स्वच्छताविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी आपले घर, परिसर, शहर आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेतली. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार, योजनेचे प्रमुख आशिष यनगंटीवार, मायनोचर पटेल उपस्थित होते.

पायलट प्रोग्रॅम
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूटतर्फे एमबीएच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘पायलट प्रोग्रॅम’चे आयोजन केले होते. या वेळी संस्थेच्या कॉलेज समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. जगदीश पोळ, प्रा. गीता जाधव, मानसी जावडेकर, अर्चना ताटकर उपस्थित होते.

वाहनांच्या सुट्या भागातून साकारले बाप्पा 
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत आगळावेगळा बाप्पा साकारला आहे. सलग ८ दिवस काम करीत खराब झालेल्या गाड्यांच्या सुट्या भागातून ४ फूटाची गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील, प्रा. डॉ. अभिजित दंडवते, विभागप्रमुख प्रा. सिद्धराज अल्लुरकर, प्रा.रत्नदीप भोरगे, प्रा.जगदीश बायस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संकेत कुबडे, कुणाल बागुल, ऋषिकेश शिंदे, नीलेश पुणेकर, विनायक आघाव, चैतन्य लोंढे, चार्ल्स नायडू, प्रतीक प्रजापती या विद्यार्थ्यांनी हा गणपती साकारला आहे. मोटारसायकलची पेट्रोल टाकी, सायलेन्सर, हेडलाइट, इंडिकेटर, पिस्टन, कनेक्‍टिंग रॉड, स्पार्क प्लग आणि स्पेअर पार्टसचा वापर विद्यार्थ्यांनी मूर्ती बनविण्यासाठी केला.

शहर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग हवा - शुक्ला
‘‘विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिकता यावे, याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्याचबरोबर शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांबरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे मत पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे आयोजित ‘पोलिस मित्र’ उपक्रमाचे उद्‌घाटन शुक्‍ला यांच्या हस्ते झाले. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी बडीकॉप आणि सिटीसेफ या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘पोलिस काका’ या विषयावरील पथनाट्य सादर केले. तसेच पोलिस मित्र भित्तिपत्रकाचे अनावरण केले. या वेळी सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, सहायक पोलिस आयुक्त गणेश गावडे, बसवराज तेली उपस्थित होते.

Web Title: pune news swatch bharat abhiyan & guidance