पुणेः अंध मुलांच्या प्रगतीने स्वीडनचे विद्यार्थी भारावले

संदीप जगदाळे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेस भेट, विविध उपक्रमांची पाहणी

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेस भेट, विविध उपक्रमांची पाहणी

हडपसर (पुणे) दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन याबाबतचा अभ्यास करण्यासाठी स्वीडन येथून आलेल्या वीस विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेस अभ्यास भेट दिली. संस्थेचे विविध उपक्रम, ब्रेल लेखन-वाचन, ब्रेल ग्रंथालय, संगणक, क्रीडा, संगीत, गायन तसेच शिक्षणामधील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती बघून व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वाद्यवृंदाने ते भारावून गेले. स्वीडनपेक्षा या शाळेतील स्वच्छता, शिक्षणपद्धती, सेवा-सुविधा, अधिक चांगल्या असून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती वाखाण्यायजोगी आहे, अशी भावना या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी व्यक्त केली.

याप्रसंगी भारती विद्यापीठ समाज विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. जी. आर. राठोड, प्रा. डॉ. एस. आय. कुंभार, पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले तसेच शिष्टमंडळातील 20 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

संचालक डॉ. राठोड म्हणाले, ""पुणे अंधशाळेचे अध्यक्ष अभिजित पवार व संस्थेचे पदाधिकारी यांची सेवाभावी वृत्ती, पारदर्शक कारभार व दृष्टिहीनांच्या कल्याणासाठीचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच ही शाळा देशात अग्रभागी आहे. आमच्या समाज विज्ञान केंद्रात प्रत्येक वर्षी स्वीडनचे विद्यार्थी भेट देतात. यावर्षी पुणे अंधशाळेचे कार्य प्रत्यक्ष पाहणे व अभ्यास करण्याची विनंती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मी गेल्या 30 वर्षांपासून या संस्थेचे दीपस्तंभाप्रमाणे व प्रेरणादायी कार्य जवळून पाहत आहे. शाळेत आल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पदोपदी जाणवते. संस्थेच्या कार्याची दखल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील 1997 मध्ये घेतली आहे. त्यामुळे या संस्थेचा आदर्श डोळे दिपवून टाकणारा असून अन्य संस्थानीसुद्धा या संस्थेचा आदर्श घ्यायला हवा.''

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news Swedish students filled with blind children's progress