रताळ्यांच्या आगमनाने ‘आषाढी’ची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - आषाढी एकादशीच्या उपवासासाठी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यातूनही रताळ्यांची आवक झाली. 

पुणे - आषाढी एकादशीच्या उपवासासाठी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यातूनही रताळ्यांची आवक झाली. 

आषाढी एकादशी, महाशिवरात्र, नवरात्र अशा उपवासाच्या कालावधीत बाजारात रताळ्यांची आवक आणि उलाढाल वाढते. आषाढी एकादशी मंगळवारी (ता. ४) असल्याने रताळ्यांची आवक वाढली आहे. यंदा बेळगाव येथून १० गाड्या, तर इतर भागांतून २० टेम्पो इतकी रताळ्यांची आवक झाली. करमाळा तालुक्‍यातील मांजरगाव, उंदरगाव भागातील शेतकऱ्यांनीही तीन हजार गोणी रताळी बाजारात आणली. बेळगाव भागातील रताळ्याला प्रतिकिलो १५ ते २० रुपये, तर करमाळा भागातील रताळ्यास प्रतिकिलो २५ ते ३५ रुपये भाव मिळाला. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत रताळ्याची आवक यंदा चांगली झाली आहे, त्यामुळे भाव कमी राहिले. बेळगाव भागातील रताळी आकाराने मोठी आणि रंगाने पांढरट असतात. कऱ्हाड भागातील रताळी आकाराने लहान आणि लालसर रंगाची, तर करमाळा भागातील रताळी आकाराने मध्यम आणि गर्द विटकरी रंगाची असतात. करमाळा भागातील रताळे हे गावरान म्हणून ओळखले जाते, ते चवीला गोड असते, अशी माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली. साधारणपणे बाजारात रताळ्याची १५० ते २०० टन इतकी आवक झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

उपवासासाठी भुईमूग शेंगांचीही मागणी वाढली आहे. शेंगांची २०० ते २५० गोणी इतकी आवक झाली; मात्र भावात विशेष बदल झाला नाही.

Web Title: pune news sweet potato for ashadhi