तळेगाव-चाकण लिंकरोड लवकरच

गणेश बोरुडे
बुधवार, 7 जून 2017

तळेगाव स्टेशन - तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा साडेचार किलोमीटर लांब व ७५ मीटर रुंदीचा चौपदरी जोडरस्ता (लिंकरोड) केला जाणार आहे. त्याच्या कामाची सुमारे साडेदहा कोटी रुपयांची अंतिम निविदा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळेगाव स्टेशन - तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा साडेचार किलोमीटर लांब व ७५ मीटर रुंदीचा चौपदरी जोडरस्ता (लिंकरोड) केला जाणार आहे. त्याच्या कामाची सुमारे साडेदहा कोटी रुपयांची अंतिम निविदा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळेगाव एमआयडीसी टप्पा एकमधून सुरू होणार लिंकरोड पुढे पॉवरग्रीड स्टेशन- नॉर्मा कंपनी- हनुमान मंदिराजवळून मिंडेवाडी मार्गे शिंदेवासुली शिवारातून चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील फोटॉन कंपनीजवळ जोडला जाणार आहे. या कामात अडथळा ठरणारे विजेचे टॉवर हटविण्यासाठी पॉवरग्रीडकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासाठी लागणारी रक्कम एमआयडीसीने भरल्यानंतर टॉवर हटविले जाणार आहेत. हा लिंकरोड साधारणतः ७५ मीटर रुंदीचा असेल. 

तळेगाव एमआयडीसी टप्पा दोनच्या संपादित क्षेत्रामधूनच प्रस्तावित रस्त्याचा बहुतांशी भाग जाणार आहे. त्यासाठी नव्याने भूसंपादनाची गरज नसेल. मात्र, नवलाख उंबरे गावाच्या पूर्वेकडील करंजविहिरे रस्त्यालगत नदीजवळील साडेचार हेक्‍टर जागा एमआयडीसीला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी खरेदीखताची एमआयडीसीची तयारी असून त्यासाठीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. सदर कामाची १०.४७ कोटींची निविदा १२ टक्के कमी दराने एका कंत्राटदाराने भरली असून ती अंतिम मंजुरीसाठी पाठविल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खेड व मावळला फायदा
तळेगाव व चाकण एमआयडीसी जोडणारा लिंकरस्ता पूर्णत्वास आल्यानंतर खेड आणि मावळ तालुक्‍यांना व लगतच्या नागरीक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. मुंबई-चाकण दरम्यानची अवजड वाहतूक भविष्यात या रस्त्यावरून वळविल्यास नेहमीच्या कोंडीतून तळेगाव आणि चाकणकरांना दिलासा मिळू शकेल. निविदा मंजुरीनंतर साधारणतः दहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असा अंदाज एमआयडीसीचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी वर्तविला.

Web Title: pune news talegav-chakan link road