तळेगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक इंगवले निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

तळेगाव स्टेशन - तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याना पायबंद घालण्याकामी असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना निलंबित केल्याचा आदेश गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाने काढला.

तळेगाव स्टेशन - तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याना पायबंद घालण्याकामी असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना निलंबित केल्याचा आदेश गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाने काढला.

15 ऑगस्ट 2015 मध्ये अस्तित्वात आलेल्या तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून रुजू झालेले पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांची आपल्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणासाठी मागील वर्षी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.त्यानंतर मॅटमध्ये त्याला आव्हान देत काही महिन्यांपुर्वी ते पुन्हा रुजू झाले.एमआयडीसी आणि तळेगाव-चाकण रोड परिसरात फोफावलेले अवैध धंदे आणि विशेषतः इंदोरीतील गुन्हेगारीकडे एमआयडीसी पोलिसांनी सदा दुर्लक्ष केले.इंदोरीत खास पोलिस चौकी उभारुनही गुन्हेगार निर्ढावतच गेले.एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधकामासाठी जमा केलेला निधी देखील कळीचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला.गेल्या दोन वर्षात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्हेगारी घटना,खुन,दरोडे,गॅस-डिझेल चोरी,वाटमारी आणि तत्सम गुन्हेगारी रोखण्याकामी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आणि तक्रारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डाॅ.विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यत पोहोचल्याने त्यांची दखल घेत,इंगवले यांना गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे समजते.गेल्या महिन्यात झालेल्या इंदोरीतील युवकाच्या खुन प्रकरणी पुर्वसुचना मिळूनही एमआयडीसी पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने सदर युवक गुन्हेगारीचा बळी ठरला.इंगवले यांच्या निलंबनामुळे कुचकामी पोलिस अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष सिंघम स्टाईल खमक्या अधिकार्यांची नेमणूक करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

"एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हेगार दहशत निर्माण करुन खुनाची धमकी देत असल्याबाबत पुर्वसुचना मिळूनही इंगवले यांनी प्रतिबंधात्मक कृती न केल्याने त्यांचे पर्यावसन युवकाच्या खुनात झाले.वाढती गुन्हेगारी,अवैध धंदे रोखण्याकामी असमर्थ ठरल्याने पोलिस निरीक्षक इंगवले यांना निलंबित करण्यात आले आहे."
- सुवेझ हक (पोलिस अधिक्षक-पुणे ग्रामीण)

Web Title: pune news talegav midc police officer ramdas ingawale suspend