'तांबोळी रिश्ते ग्रुप' व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जुळतात 'रेशीमगाठी'

अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात
अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजन एकत्रीत आले आहेत. त्यातून चांगल्या वाईट विचाराचे संदेशवहन होत असते. काही ग्रुपच्या माध्यामातून बदनामी हेतूने तसेच समाजात अशांतता पसरविण्याचे काम केले जाते. त्यावेळी पोलिसांना देखील यावर नजर ठेवत गुन्हे दाखल करावे लागते. याउलट पुणे जिल्ह्यातील तांबोळी समाजाच्या वतीने व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून 'तांबोळी रिश्ते ग्रुप'च्या माध्यमातून तरूण तरूणीच्या रेशीमगाठी बांधण्याचे काम होऊ लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पुणे जिल्ह्यात तांबोळी समाज हा बलुतेदार पद्धतीत मोडणारा समाज आहे. पान व्यवसायातून आपली उपजीवीका चालविणारा हा समाज आहे. त्यामुळे जून्या रितीरीवाजात प्रत्येक गावात तांबोळी कुटूंब वास्तव्य करून राहताना दिसतो. शिक्षणात प्रगती झाली तसा या समाजात बदल घडून येऊ लागला आहे. जुने पानमळे नाहीसे होत आहेत. नागरीकांच्या मानसिकतेत बदल झाल्याने पान व्यवसाय देखील मोडकळीस येऊ लागला आहे. त्यामुळे या समाजातील नागरीक वेगळे व्यवसाय करताना दिसतात. मुस्लीमांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या सुवीधा यातून शिक्षण घेणारी पिढी घडू लागली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक मिळविण्यासाठी धडपडणारी पिढी घडू लागली आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात या तांबोळी समाजाची मुले काम करताना दिसतात.

तांबोळी समाजातील मुली देखील विविध स्तरावर शिक्षण घेताना दिसतात. वैद्यकिय, इंजीनीअरींग, कृषी तंत्रज्ञान सारख्या विविध पदव्या घेऊ लागल्या आहेत. मुलींचा शैक्षणीक स्थर वाढला आहे. त्यामानाने मुलांमध्ये शिक्षणाच्या संधी मिळवून ही फक्त व्यवसाय भिमुख शिक्षण घेण्याकडे कल आहे. त्यामुळे या समाजात वर हे कमी शिक्षण घेणारे दिसून येतात. या समाजाच्या माध्यमातून दरवर्षी वरवधू मेळावे घेऊन मुलामुलींची लग्ने जुळविण्याचा प्रयत्न केला जातो. खर्च वाचविण्यासाठी या समाजात सामुदायीक विवाह सोहळे पार पाडले जातात.

पुणे जिल्ह्यात सामुदायीक विवाहाची चळवळ तांबोळी समाजातून प्रथम सुरू झाली. सध्या समाजातील बदलती परीस्थीती पहाता विवाह जुळविणे जिकीरीचे झाले आहे. योग्य जोडीदार मिळण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यातून पालकांची चांगलीच दमछाक होताना दिसते. त्यामुळे पुणे येथील तरूणांनी एकत्रीत येऊन तांबोळी समाजाच्या वतीने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून 'तांबोळी रिश्ते ग्रुप' तयार केला आहे. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात तांबोळी समाजाची जवळपास 600 कुटूंब जोडली गेली आहेत. ग्रुपच्या माध्यमातून वर वधूंची माहिती गोळा केली जात आहे. योग्य तरूण व तरूणीची माहिती देऊन संबधीत ग्रुपवर विनामुल्य माहिती पुरवली जात आहे. ही माहिती घेऊन योग्य पद्धतीने लग्न जुळविण्याचे काम पालक करत आहेत. वर-वधूंना योग्य जोडीदार शोधणे सोपे झाल्याने त्यांच्यातही या ग्रुपविषयी कुतुहलता दिसून येत आहे. सोशल मिडीयाचा असाही चांगला वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून नोकरी...
तांबोळी समाजातील जुन्या अज्ञानामुळे हा समाज मागे पडला असून, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना देणे अपेक्षीत आहे. मुलींना उच्चस्थरीय शिक्षणाच्या योग्य संधी मिळण्यासाठी गैरसमजूती दूर झाल्या पाहिजे. या तरूणांच्या माध्यमातून जवळपास 20 लग्ने जुळविण्याचे काम झाले आहे. तांबोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून नोकरी संदर्भ, सरकारी योजना व सरकारी हक्क, कायदे याबाबत देखील माहिती पुरवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com