शिक्षकांअभावी शाळा एकत्रित भरविणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन्ही सत्रातील शाळा एकत्रित भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे. तो मंजूर होताच, लगेच अंमलबजावणी होईल.
- शिवाजी दौंडकर, प्रशासकीय अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

पुणे - महापालिका शिक्षण विभागातील अपुऱ्या शिक्षक संख्येचा ताण आता विद्यार्थ्यांच्या माथी पडणार आहे. शिक्षकांअभावी सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळा एकत्रित भरविण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून अशा १८ शाळा एकत्रित भरणार आहेत. या प्रयोगामुळे प्रत्येक वर्गाला शिक्षक आणि शाळेला मुख्याध्यापक पुरविणे शक्‍य होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.

महापालिका शिक्षण विभागाकडे २८८ प्राथमिक शाळा असून, त्यातील विद्यार्थी संख्या सुमारे ९४ हजार इतकी आहे. गेल्या काही वर्षांत हा आकडा १० हजारांनी कमी झाल्याची नोंद आहे. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार शिक्षकांची नेमणूक आहे. त्यात मुख्याध्यापकांचाही समावेश आहे; मात्र ही शिक्षक संख्या पुरेशी नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे आढळून आले. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वर्गासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचे नियोजन केले होते; मात्र त्यात अडचणी आल्याने सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळा एकत्र भरविण्याचा प्रयोग केला जाणार असून, मराठी माध्यमाच्या १७ आणि एका इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. अशा प्रकारे शाळा एकत्र भरविण्याला काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता; पण तांत्रिक कारणे पुढे करत हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करून घेण्यात आला आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

पटसंख्या वाढण्याची शक्‍यता?
महापालिकेकडे प्राथमिक शाळांसाठी केवळ १४६ इमारती आहेत. ही संख्या कमी असल्याने त्या वाढविणार आहेत; मात्र नव्या वर्षात किमान १० इमारती शाळांसाठी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवून पटसंख्या वाढीवर भर होता; मात्र काही शाळांमध्ये पटसंख्या कमी होत आहे. हे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा विचार करून सकाळ आणि दुपारच्या सत्रातील काही शाळा एकत्र घेण्याचा निर्णय आहे. त्यामुळे सर्व वर्गांना शिक्षक आणि शाळेला मुख्याध्यापक असेल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: pune news teacher municipal school