टेमघरमधून जुलैपासून वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

टेमघर धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिन्यात त्याची चाचणीदेखील घेण्यात आली आहे. येत्या जुलैपासून या प्रकल्पातून वीजनिर्मितीला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.
- सुधीर अत्रे, शाखा अभियंता, टेमघर प्रकल्प 

पुणे - टेमघर धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात येत असलेल्या पाण्यावरील वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या जुलैपासून या प्रकल्पातून प्रत्यक्षात चार मेगावॉट एवढ्या वीजनिर्मितीला सुरवात होणार आहे. सुमारे पाच हजार घरांना पुरेल एवढ्या विजेची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर हे एक धरण आहे. या धरणाची क्षमता ३.७१ टीएमसी आहे. या धरणाचे सध्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरते. त्यानंतर त्या धरणातून आवश्‍यकतेनुसार खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वीच्या सरकारने घेतला होता. त्यानुसार वीजप्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, येत्या जुलैपासून तो प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यातून निर्माण होणारी वीज संबंधित ठेकेदार कंपनीकडून नॅशनल ग्रीडला जोडली जाणार आहे. 

सध्या या धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने न भरू देता, त्यातून वारंवार पाणी सोडण्यात येते. दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे यंदाही धरणात पाणी साठविले जाणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात आणि त्यानंतरही या धरणातून जेव्हा जेव्हा पाणी सोडण्यात येणार आहे, त्यावेळेस त्यातून वीजनिर्मितीचे काम केले जाणार आहे.

एक मेगावॉटचे चार संच
टेमघर धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती केंद्रात १ मेगावॉटचे चार संच उभारण्यात आले आहेत. त्यातून एकूण चार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. पानशेत आणि वरसगावनंतर आता या प्रकल्पातील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे.

असा झाला प्रकल्प
 बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचा निर्णय
 २००९ मध्ये निविदा मागवून कंपनीला काम
 तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाचे काम रखडले
 त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ
 डिसेंबर २०१७ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण
 त्याच महिन्यात चाचणीदेखील यशस्वी

Web Title: pune news temghar dam electricity generation