पुण्यात 8.7 अंश सेल्सिअस तापमान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका ; उत्तरेकडून लाट

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका ; उत्तरेकडून लाट
पुणे - उत्तरेकडून येणारी थंडीची लाट, थंडीसाठी पोषक असणारे वातावरण आणि निरभ्र आकाश, यामुळे पुणे आणि परिसरासह राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात गोंदियामध्ये 7.5 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली; तर पुण्यातील थंडीने गुरुवारी नोंदविलेला नीचांक मोडला असून, आज 8.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महाबळेश्‍वरपेक्षाही अधिक थंडी असल्याचे दिसून येत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि परिसरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. पुणे आणि पाषाण परिसरात 8.7 अंश सेल्सिअस तापमान, तर लोहगावमध्ये 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कडाक्‍याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरपेक्षाही आता पुण्यात जास्त थंडी आहे. महाबळेश्‍वरमध्ये 13.4 अंश सेल्सिअसइतके किमान तापमान नोंदविले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्‍वरपेक्षा पुण्यातील किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे; तर कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे दिसून आले.

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विदर्भात थंडीच्या लाटेची शक्‍यता
राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असून, मंगळवारपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 30) थंडीचा लाट येण्याची शक्‍यता आहे. पुण्यात रविवारी (ता. 31) आणि सोमवारी (ता. 1) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता असली, तरीही पुढील दोन दिवस किमान तापमान 9 ते 8 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Web Title: pune news temperature decrease in pune