कंपनी विकून जगभ्रमंतीचा ध्यास!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

करिअर आणि पैसा यात आयुष्य घालविण्याबरोबरच तरुणांनी स्वत:साठी वेळ काढून फिरण्याचा आनंदही घ्यावा. स्वत: चारचाकी, दुचाकीवर प्रवास करून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच विविध देशांमध्ये भ्रमंती करत राहायला हवे. परदेशांत खास वेळ काढून अशा पद्धतीने भ्रमंती करण्याचा ट्रेंड आहे.
- चारू श्रोत्री

पुणे - पर्यटनाची आवड स्वस्थ बसू देत नाही, हे वयाची पन्नाशी ओलांडलेल्या चारू श्रोत्री यांच्याबाबत अगदी खर ठरलंय. जीवन जगण्यासाठी आवश्‍यक पैसे कमवून त्यांनी स्वत:ची कंपनी विकली आणि जगभ्रमंतीसाठी मोकळे झाले. आजवर अनेक ठिकाणी प्रवास केलेल्या श्रोत्री यांनी पुणे ते जर्मनी असा २२ हजार किलोमीटरचा प्रवास अडीच महिन्यांत पूर्ण केला. ‘चारचाकी चालविण्याची आवड आणि पर्यटनाचा छंद मला भ्रमंती करण्याची ऊर्मी देतो’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

श्रोत्री यांनी १९८९ मध्ये ऑटोमोबाईलसाठी आवश्‍यक उपकरणे बनविणारी कंपनी सुरू केली. पुण्यात दोन आणि उत्तराखंडमध्ये एक अशा तीन कंपन्या सुरू केल्या. मात्र, २०१० मध्ये या कंपन्या विकून ते भ्रमंती आणि सामाजिक कार्यात रमले. १० जूनला सुरू केलेला पुणे-जर्मनी हा प्रवास त्यांनी २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण केला. यात श्रोत्री यांच्यासमवेत मेधा भालेराव, सुजल पटवर्धन, मनोज राऊल, राजेश रेड्डी, विजय वर्धन, विनय माळवे, चेतन पाटील हे सहभागी झाले होते. या सर्वांनी पुणे ते स्पेन असा प्रवास केला. त्यानंतर श्रोत्री हे एकटेच जर्मनीपर्यंत गेले. 

पुणे, इंफाळ, म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, उझबेकिस्तान, कझाकिस्थान, रशिया, इस्टोनिया, लाटविया, कलेनीन ग्राड, पोलंड यामार्गे त्यांनी जर्मनीपर्यंतचा प्रवास केला. हा प्रवास २१ हजार ६४४ किलोमीटरचा होता. यासाठी प्रत्येकी किमान २० लाख रुपये खर्च आला. 

यापूर्वी त्यांनी पुणे ते नेपाळ-भूतान असा साडेअकरा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

Web Title: pune news Tourism