सिंहगडावर दोन दिवसांत अकरा हजार पर्यटक 

सिंहगडावर दोन दिवसांत अकरा हजार पर्यटक 

खडकवासला - सलग दोन दिवसांची सुटी आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले सिंहगड परिसराकडे वळली. गडावर वन विभागाने मर्यादित पर्यटकांनाच सोडल्याने दोन दिवसांत केवळ 11 हजार जणांना गडावर जाता आले. 

शनिवारी एक हजार 60 दुचाकीतून सव्वादोन हजार, 298 चार चाकीतून 1500 व खासगी प्रवासी वाहनातून आठशे असे साडेचार हजार पर्यटक गडावर आले होते. रविवारी एक हजार 456 दुचाकीतून तीन हजार, 401 चारचाकीतून 2000 हजार व खासगी वाहनातून दीड हजार पर्यटक असे साडेसहा हजार पर्यटक गडावर गेले होते. अशा प्रकारे दोन दिवसांत सुमारे 11 हजार पर्यटक गडावर गेल्याचे वन विभागाच्या नोंदीवरून समजते. 

पाऊस असल्याने दरडी पडण्याचा धोका असल्याने मागील काही दिवसांपासून सिंहगडावर मर्यादित पर्यटकांना पाठविले जात आहे. आज दिवसभरात सकाळी दहा वाजता, बारा, दीड, तीन वाजता गडावर वाहतूक सोडणे बंद केले होते. गडावरील वाहनतळावर वाहने लावण्यास जागा झाली की, गडावर पर्यटक सोडले जात होते. 

ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक दुपारी सव्वादोन वाजता कुटुंबासह डोणजे चौकातून सिंहगड घाट रस्त्याने गडावर गेले. पोलिस अधीक्षक येणार असल्याची माहिती हवेली पोलिसांनी वन विभागाच्या उपद्रव शुल्क नाक्‍यावर दिली होती. घाटात गर्दी होणार नाही. याची दखल पोलिस व वनविभागाने घेतली होती. 

नाक्‍यावर वाहन तपासणी 
वन विभागाचे सुरक्षारक्षक, सिंहगड पावित्र मोहीम, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सिंहगडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. ज्यांच्याकडे मद्य, मांसाहाराचे साहित्य आढळले ते कार्यकर्त्यांनी नष्ट केले. सुशांत खिरीड, संतोष गोपाळ, ओंकार कोल्हे, सौरभ भुवड, प्रथमेश भुकन, सुयोग कानगुडे या तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते. 

खडकवासला चौपाटीवर गर्दी 

चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्याने धरणाच्या चौपाटीवर आणि नदी पुलावर शनिवारी व रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. 

धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने चौपाटी परिसरात वाहने लावण्यास जागा नव्हती. धरण चौकापासून श्री तुकाई किनारा परिसरापर्यंत रस्त्यालगत वाहने पार्किंग केली होती. दुपारी चारपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com