वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उद्योग क्षेत्राची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सततच्या कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होतात. या रस्त्यावरील परिस्थिती गंभीर होत असतानाही महापालिका, वाहतूक पोलिस उपायोजना करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, उद्योगांच्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या फोरमच्या माध्यातून येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पुणे - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी "सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिब्लिटी'अंतर्गत सुरळीत वाहतुकीचे उपाय आखण्यात येणार आहेत. त्यासाठी या भागातील उद्योगांची मदत घेण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीने नेमक्‍या सेवा-सुविधा जाणून घेऊन त्या उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत वाहनचालक आणि पादचाऱ्यांची सुटका होण्याची शक्‍यता आहे.
माहिती उद्योग तंत्रज्ञानासह (आयटी) विविध क्षेत्रांतील छोट्या-मोठ्या उद्योगांना एकत्र आणून "नगररोड ट्रॅफिक फोरम'ची स्थापना करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पुढील आठवडाभरात वाहतूक समस्यांचे प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना त्याचे सादरीकरण केले जाईल, अशी माहिती फोरमचे निमंत्रक आणि नगरसेवक महेंद्र पठारे यांनी दिली.

नगर रस्त्यावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर तास न्‌ तास वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. पावसामुळे सोमवारी सायंकाळी झालेल्या कोंडीत अडकलेल्या काही प्रवाशांचे विमान चुकल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. त्यातील काही प्रवाशांनी पायी जावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. सततच्या कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होतात. या रस्त्यावरील परिस्थिती गंभीर होत असतानाही महापालिका, वाहतूक पोलिस उपायोजना करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, उद्योगांच्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या फोरमच्या माध्यातून येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पठारे म्हणाले, ""या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावाही केला जातो आहे. पण, संबंधित यंत्रणांकडून पावले उचलली जात नाहीत. येरवड्यातील पर्णकुटी चौक ते वाघोलीपर्यंत रोज सकाळी आणि सायंकाळी कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ जातो. कोंडीमुळे रस्त्यावर सतत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी या भागातील उद्योगांच्या मदतीने सुरक्षित वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार "सीएसआर'अंतर्गत उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनबरोबर चर्चा सुरू आहे.''

वाहतूक कोंडीची कारणे
नो पार्किंगचे फलक असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग
"नो एंट्री'तील वाहनांचे वाढते प्रमाण
सिग्नल व्यवस्थेकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष
वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या
गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, हयात हॉटेल चौक, टाटा गार्डरूम चौक, खराडी बायपास चौकातील सिग्नल न पाळणे
पर्णकुटी चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले पथारी व्यावसायिक
रस्त्यावरील उभी राहणारी प्रवासी वाहतूक करणारी वाहने विशेषतः खासगी प्रवासी बस, सहाआसनी रिक्षा

फोरमचे नियोजन.
-वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डनची नेमणूक
-शंभर बॅरिकेड्‌स उपलब्ध करणे
-शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र थांबे
-सुरळीत वाहतुकीच्या उपाययोजनांसाठी निधी उभारणे
-खासगी वाहनांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम
-वर्दळीच्या चौकांमध्ये पादचाऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक

Web Title: pune news: traffic corporate sector