वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन

रवींद्र जगधने
सोमवार, 10 जुलै 2017

वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. त्याची वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका आजपासून...

वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. त्याची वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका आजपासून...

पिंपरी - शहरातील विविध चौक व रस्त्यांवर नो-पार्किंग, सम-विषम पार्किंग, वेगमर्यादा, एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मर्यादा, प्रदूषण नियंत्रण, नो-हॉर्न झोन असे विविध नियमांचे पोलिस व महापालिका प्रशासनाने फलक लावले आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम प्रामाणिक नागरिक व पोलिसांवर होत आहे. शहरातील मुख्य चौक व बाजारपेठेत कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहने बेशिस्तपणे थांबवली जातात. अनेक बेफिरपणे दामटतात. पोलिस असूनही त्यांना कोणी जुमानत नाही, अशी स्थिती आहे.   

तीन व सहा आसनी रिक्षा, टॅक्‍सी, टुरिस्ट, टमटम आदी वाहनांची संख्या वाढत असून, त्यांच्या चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जातात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चौकात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे एकाचा बळी गेला. तसेच रिक्षाचालकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, शहरात मीटरचा वापर होत नाही. टप्पा वाहतुकीत तीन आसनी रिक्षातून चक्क सात प्रवासी भरले जातात. रिक्षाचालकांसाठी असलेले नियम त्यांच्याकडून पाळले जात नाहीत. 

अनेकदा काही चालक वाहतुकीचे नियम पाळतात. सिग्नल बंद असल्याने झेब्रा क्रॉसिंग अगोदरच वाहन थांबवले जाते; मात्र त्या मागील वाहनचालक कधी हॉर्न वाजवून, तर कधी आरडाओरडा करून प्रसंगी दादागिरी करून प्रामाणिक वाहनचालकांना वाहन पुढे घ्यायला लावतात. त्यामुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होते.

वाहतूक नियमांबाबत नेहमीच जनजागृती केली जाते; मात्र वाढती वाहनसंख्या व रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्याचा पोलिसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस नेहमीच प्रयत्नशील असतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली जाणार आहे. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग. 

Web Title: pune news traffic rules violations