एकात्मिक वाहतूक विकास प्राधिकरण स्थापणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - शहरात वाहतुकीबाबत बहुविध प्रकल्प साकारत असताना एक वर्षात एकात्मिक वाहतूक विकास प्राधिकरण (उमटा) स्थापन करण्याचा मनोदय राज्य सरकारने केला आहे.

पुणे - शहरात वाहतुकीबाबत बहुविध प्रकल्प साकारत असताना एक वर्षात एकात्मिक वाहतूक विकास प्राधिकरण (उमटा) स्थापन करण्याचा मनोदय राज्य सरकारने केला आहे.

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये "महामेट्रो'कडून वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या विस्तारीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

तसेच, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 100 किलोमीटरची "बीआरटी' निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान लोणावळा-पुणे लोकलचे विस्तारीकरण दौंडपर्यंत करण्याचीही प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, पीएमआरडीएचा रिंग रोड आदी प्रकल्पांसाठीही प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात एकात्मिक वाहतूक विकास प्राधिकरण तातडीने स्थापन करावे, अशी मागणी पीएमपीचे या पूर्वीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी राज्य सरकारकडे केली होती. तसेच हे प्राधिकरण स्थापन करेपर्यंत पीएमपीतर्फे एकात्मिक विकास प्राधिकरणाचे काम द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नुकताच एक आदेश काढून "उमटा' एक वर्षात स्थापन करण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र, त्याचे स्वरूप, त्याचे अध्यक्षपद कोणाकडे असेल, या बाबतचा तपशील जाहीर केलेला नाही.

भाडेनियंत्रण समितीसाठी विनंती
"पीएमआरडीए'कडून सुरू असलेल्या नियोजित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भाडे निश्‍चित करण्यासाठी "मेट्रो ऍक्‍ट 2002' नुसार या प्रकल्पासाठी भाडे नियंत्रण समिती स्थापन करण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. या समितीमध्ये केंद्रीय नगर विकास खात्याचे काही सचिव आणि राज्याच्या नगर विकास विभागातील अधिकारी, मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: pune news transport development pradhikaran state government