वृक्षगणनेचे गौडबंगाल

Sakal-Vishesh
Sakal-Vishesh

पुणे - एकीकडे शहरातील 23 लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली आहे, असे केवळ वरवर सांगितले जाते आहे, मात्र दुसरीकडे त्याचा कोणताही तपशील महापालिकेला मिळालेला नसतानाही घाईघाईने त्यातील 19 लाख वृक्ष गणनेचे 4 कोटी 29 लाख रुपये महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला देऊन टाकले आहेत. तसेच शहराचा "बेस मॅप' उपलब्ध नसतानाही वृक्षगणना झालेली आहे. पावसाळ्यात वृक्षगणना करायची नाही, असे ठरलेले असतानाही त्या कालावधीतही गणना होऊन त्याचे बिलही अदा झाले आहे. त्यामुळे शहरातील वृक्षगणनेचे गौडबंगाल वाढले आहे.

शहरात नेमके वृक्ष किती आहेत, याची पाहणी करण्यासाठी महापालिकेने मार्च 2016 मध्ये वृक्षगणनेचे कंत्राट "सार आयटी रिसोर्सेस' या कंपनीला दिले. त्यासाठी उद्यान विभाग आणि "सार'मध्ये करार झाला. त्यात महापालिकेने शहराचा "बेस मॅप' उपलब्ध करून दिल्यावर त्याच्या आधारे गणनेचे काम सुरू होईल, असे म्हटले होते. तसेच एक लाख वृक्षांची गणना झाल्यावर तज्ज्ञ समितीकडून त्या गणनेची पडताळणी करून घ्यायची तसेच या गणनेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आणि त्यांनाही गणनेच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे, असेही ठरले होते. पावसाळ्यात 30 दिवस गणना करणे शक्‍य नसल्यामुळे त्या काळात ही प्रक्रिया करायची नाही, असेही या करारात म्हटले होते. परंतु, या करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत आढळले आहे. गणनेची पडताळणी करण्यासाठी डॉ. संदीप जाधव, डॉ. दिगंबर मोकाट आणि डॉ. विजय मेहता यांची महापालिकेने नियुक्ती केली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यानंतर त्यांच्याकडून गणनेची पडताळणीच झालेली नाही, असे आढळले आहे. शहरात 2013 मध्ये वृक्षगणना झाली तेव्हा 36 लाख वृक्ष होते. त्यात दोन लाखांची वाढ गृहीत धरून नवी गणना सुरू आहे.

गणनेतील प्रमुख आक्षेप
- गणनेसाठीचा करार स्थायी समितीचे सदस्य आणि संबंधित कंपनी यांच्यामार्फत करणे अपेक्षित होते. प्राधिकरणाचे तत्कालीन सदस्य गजानन थरकुडे आणि डॉ. शंतनू जगदाळे यांच्या स्वाक्षऱ्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून करारावर झालेल्या आहेत.

- गणना पूर्ण झालेल्या वृक्षांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. परंतु, त्या बाबतची प्रक्रिया झालेली नाही.

- महापालिकेने परिमंडळनिहाय पाच अधिकाऱ्यांची वृक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनीही गणनेची पडताळणी करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांच्याकडून पडताळणी झालेली नाही.

- महापालिकेने वृक्ष अधिकारी म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. परंतु, उद्यान विभागामार्फतच गणनेची बिले थेट काढली जातात.

- गणना झालेल्या एकाही वृक्षाची माहिती महापालिकेकडे नाही.
- गणना संपत आली तरी महापालिकेने बेस मॅप दिलेला नाही. हा बेस मॅप दिल्यावर गणनेचे तपशील त्यात नोंदवून संबंधित माहिती महापालिकेला सादर होणार होती. त्यामुळे अचूकतेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

13 लाखांनंतरचे आम्हाला माहिती नाही!
एक लाख वृक्षांची गणना झाल्यावर तीन तज्ज्ञ सदस्यांच्या समितीकडून त्याची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. परंतु, 13 लाख वृक्षांच्याच गणनेची पडताळणी तज्ज्ञ समितीकडून झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून संबंधित ठेकेदार, महापालिकेकडून आम्हाला पडताळणीसाठी बोलविण्यात आलेले नाही, असे तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात आता गणना 23 लाख झाली आहे. त्यामुळे उर्वरित 10 लाख वृक्षांच्या गणनेची पडताळणी कोणीही केलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे. तरीही संबंधित संस्थेला 19 लाख वृक्षांच्या गणनेचे बिल देण्यात आले आहे.

पावसाळ्यात गणना चालते की!
या बाबत उद्यान विभागातील संबंधित अधिकारी म्हणाले, 'शहराचा बेस मॅप "सार'ला देण्यासाठी सांख्यिकी विभागाने सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दोन महिन्यांत त्यांना तो मॅप देऊ; त्यानंतर गणनेचा तपशील महापालिकेला मिळेल. गणनेबाबत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य समाधानी आहेत. त्यांची कोणतीही तक्रार नाही.'' पावसाळ्यात पाऊस नसेल त्या दिवशी गणना करण्यास हरकत नाही. या गणनेत कोणत्याही त्रुटी नाहीत. तसेच तज्ज्ञांकडून नियमित पडताळणी होते, असेही त्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. वृक्ष आणि उद्यान हे एकच विभाग आहेत. त्यामुळे त्यांचे काम एकत्रितच चालते, असेही ते म्हणाले.

गणनेचे तपशील देता येईना!
प्राधिकरणाच्या सदस्यांनी गणनेची माहिती मागितल्यावर गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी बैठकीत "सार'ने सादरीकरण केले. त्या बैठकीत महापालिकेचे आवार, कॉंग्रेस भवनाजवळील परिसर, घोले रस्ता, जंगली महाराज रस्ता या परिसरातील गणनेचे तपशील मागितले. परंतु, "सार'ला त्याचे सादरीकरण करता आले नाही, असे प्राधिकरणातील नगरसेवक आदित्य माळवे तसेच सदस्य शिल्पा भोसले, संदीप काळे आदींनी सांगितले.

ऑगस्टपर्यंत गणना पूर्ण होणार
या बाबत "सार' शी संवाद साधला ते म्हणाले, '23 लाख वृक्षांची गणना झाली आहे. उर्वरित वृक्षांची गणना ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. झाडांची गणना अक्षवृत्त-रेखावृत्त पद्धतीने होत आहे. त्यासाठीचे ऍप कंपनीने विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे गणनेचे शुल्क थोडे वाढले आहे. या गणनेत 425 प्रजाती आढळल्या असून 86 दुर्मिळ वृक्षांचा समावेश आहे.'' पावसाळ्यात गणना करू शकतो. तज्ज्ञांकडून नियमितपणे पडताळणीही होते. गणनेची माहिती "सीडी'द्वारे उद्यान विभागाकडे दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत 10 रुपये तर पुण्यात 22 रुपये 70 पैसे का?
मेजर जनरल सुधीर जटार (नागरी चेतना मंच) - नाशिक, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांत "जिओ टॅगिंग'द्वारे वृक्षगणनेसाठी प्रती वृक्ष 10 रुपयांच्या आसपास शुल्क आकारले जाते. पुण्यात मात्र, 22 रुपये 70 पैसे प्रती वृक्ष शुल्क आकारले जाते. इतका फरक कसा असू शकतो? प्रशासनानेही 16 रुपये अंदाज गृहीत धरला होता, हे सर्वच अनाकलनीय आहे.'' गणनेचा महापालिकेच्या संकेतस्थळावर उल्लेख असेल, असे सांगितले होते. परंतु, त्या बाबतची काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. गणनेच्या प्रक्रियेत नागरिकांना सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com